छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेले अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह यांनीही या शोमधून वर्षानुवर्षे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे. मात्र नंतर तो शोमधून अचानक गायब झाला. अभिनेता काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. अभिनेत्याने स्वत: हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेअर करत त्याची अवस्था दाखवली होती. मात्र यानंतर अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याच्या वडिलांनी आरोग्याची माहिती दिली की अभिनेत्याने खाणे-पिणे सुरु केले आहे आणि तो हळूहळू त्याच्या दैनंदिन दिनचर्येत परत येत आहे. (Gurucharan Singh now wants to start working)
गुरुचरण सिंहला आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायची आहे. त्याला इंडस्ट्रीत परतायचे आहे आणि त्यासाठी त्याने ‘तारक मेहता’च्या निर्मात्याशी संवाद साधला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंहने त्याच्या आरोग्याबद्दल आणि आर्थिक परिस्थितीबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे निर्माते असित मोदी यांना या निर्मिती संस्थेत काम करण्यास सांगितले होते. गुरुचरण सिंह त्याच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे नाराज आहे.
याबद्दल अभिनेता म्हणाला, ‘खरं तर, मला सर्वांना गुरुपर्वाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्या दिवशी मला गुरुद्वारात जायचे होते, पण माझी तब्येत बिघडली आणि मला रुग्णालयात दाखल करावे लागले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा डॉक्टरांनी मला ग्लुकोज दिला. त्यावेळी मला वाटले की, मी माझ्या सर्व प्रियजनांना शुभेच्छा द्याव्यात. मी ते केले आणि माझा व्हिडीओ व्हायरल झाला. मला या संपूर्ण गोंधळाची माहिती नव्हती. मी सगळं मनापासून करतो, पण लोक ते चुकीच्या अर्थाने घेतात”.
यानंतर गुरुचरणने असं सांगितलं की, “मी असित भाईंना प्रॉडक्शनमध्ये काही काम देण्यास सांगितले होते. मी कलाकारांकडे जाऊ शकतो आणि त्यांच्या समस्यांबद्दल त्यांच्याशी बोलू शकतो. एक कलाकार म्हणून मी ते उत्तमपणे हाताळू शकतो. मला माहित आहे की, मी काय करेन?, समस्या काय आहे? जेणेकरून मी ती अशा प्रकारे हाताळू शकेन की कलाकार शो सोडणार नाही”.