‘ताल, ‘रेस’, ‘हलचल’, ‘इत्तेफाक’ आणि ‘दृश्यम २’सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयासाठी प्रशंसा मिळवणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षय आगामी ‘छावा’ या चित्रपटातून अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो औरंगजेबाची भूमिका साकारतोय. लाइमलाइटपासून दूर असलेल्या अक्षयला त्याचं खासगीपण जपायला खूप आवडतं. तो लवकरच वयाची पन्नाशी गाठणार आहे, मात्र अद्याप त्याने लग्न केलं नाही. यामागचं कारण त्याने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय खन्नाने स्वत:च्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. (akshaye khanna on his marriage)
याबद्दल तो असं म्हणाला की, “मी स्वत:ला विवाहित या दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलोच नाही. लग्न ही एक कमिटमेंट असते, ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात बरेच बदल होतात. लग्नामुळे बरंच काही बदलतं. मला माझं आयुष्य माझ्याच नियंत्रणात असलेलं आवडतं. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करता, तेव्हा स्वत:च्या आयुष्यावर तुमचं संपूर्ण नियंत्रण राहत नाही. तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते”.
यापुढे त्याने लग्न न करता मुलांना दत्तक घेण्याबद्दल आणि सरोगसीबद्दल असं म्हटलं की, “मी त्या आयुष्यासाठी तयार नाही. मला माझं आयुष्य कोणाबरोबर शेअर करायचं नाही. मग ते लग्न असो किंवा मुलंबाळं असो. त्यांच्यामुळेही तुमच्या आयुष्यात बरेच बदल होतात. आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीमुळे जे बदल होतात, ते मला नको आहे. मला जे हवं, ते त्यातून मिळणार नाही. मला वाटत नाही की मी भविष्यातही ते करायला तयार असेन”.
आणखी वाचा – Video : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, व्हिडीओ व्हायरल
अक्षय त्याच्या आगामी छावा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय विषयी असं म्हटलं की, “तो खूप चांगला माणूस आहे. “तो काही मोजकेच प्रोजेक्ट करतो, पण तो जे काही करतो ते तो मनापासून करतो”. त्यामुळे आता ‘छावा’मध्ये त्याची भूमिका पाहण्यासाठी अनेक चाहते मंडळी उत्सुक असतील हे नक्की