गेल्या काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे चर्चेत आले होते. एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. राहुल सोलापूरकर यांच्यावर या विधानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच कलासृष्टीतूनही टीका-टिप्पणी केली जात आहे. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. बरेच जण त्यांना खडेबोल सुनावत आहेत. अशातच अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही राहुल सोलापूरकरांच्या व्यक्तव्यावर टीका केली आहे. हेमंत ढोमे हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो अनेकदा राजकीय व सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना दिसतो. (Hemant Dhome angry on Rahul Solapurkar)
हेमंत ढोमेने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर राहुल सोलापूरकरांच्या विधानाबद्दल पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगच सगळे सोलापूरकर बदनाम होतात”. हेमंत ढोमे आधी अभिनेते किरण माने यांनीही राहुल सोलापूरकरांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या!
— Hemant Dhome | फसक्लास ढोमे (@hemantdhome21) February 4, 2025
आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या!
रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात!
असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे!
उगच…
राहुल सोलापूरकरांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होतं. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असं काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिलं गेलं. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत”.
यापुढे त्यांनी दावा करत असं म्हटलेलं की, “औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचं. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेलं आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही”.
दरम्यान, राहुल सोलापूरकर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ‘हाय कमांड’, ‘राम रहीम’, ‘थरथराट’, ‘नशीबवान’, ‘धुमाकूळ’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘राजमाता जिजाऊ’, ‘पळवा पळवी’ आणि ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे राहुल सोलापूरकर सध्या त्यांच्या या वादग्रस्त विधानाची चर्चा होत आहे.