Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben : मालिकाविश्वातील नेहमीच चर्चेत असणारी आणि लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. २००८ पासून ही मालिका अविरतपणे सुरु असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे आणि मालिकेने चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. हा शो अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असला तरी लोकांना त्यातील हृदयस्पर्शी पात्रे आवडतात. यापैकी ‘दयाबेन’ हे सर्वात लोकप्रिय नाव आहे, ज्याची भूमिका शोच्या सुरुवातीपासून दिशा वाकाणीने साकारली होती. तथापि, अभिनेत्रीने २०१८ मध्येच शो सोडला आणि ती पुन्हा काही या शोमध्ये परतली नाही. दिशा वकानीला ‘दयाबेन’च्या भूमिकेत परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे निर्मात्यांनी अनेकदा सांगितले. पण अलीकडील अपडेटमध्ये, त्यांनी निराशाजनक बातमी शेअर केली की, अभिनेत्री शोमध्ये परतणार नाही.
असित मोदी यांनी नुकतेच News18 शी बोलताना ‘दयाबेन’बद्दल सांगितले. ते म्हणाले की, “ती या शोचा अविभाज्य भाग आहे आणि तिला परत आणायचे आहे. परंतु बदलत्या परिस्थितीमुळे त्यांच्याकडून विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले”. असित म्हणाले, “दयाबेनला परत आणणं खूप गरजेचं आहे कारण मलाही तिची आठवण येते. कधीकधी परिस्थिती अशी बदलते की काही गोष्टी घडतात आणि उशीर होतो. कधी कधी कथा लांबते. कधी कधी काही मोठ्या घटना घडतात. २०२४ मध्ये निवडणुका होत्या, आयपीएल होते आणि त्यानंतर वर्ल्ड कपचे सामने होते, पावसाळ्यात काही कारणांमुळे उशीर होतो”.
त्याच मुलाखतीत, असित मोदीने दिशा वाकाणीच्या शोमध्ये परत येण्याच्या शक्यतेबद्दल चर्चा केली आणि पुष्टी केली की ती सध्या तसे करु शकणार नाही. असित म्हणाले, “मी अजूनही प्रयत्न करतोय. मला विश्वास आहे की दिशा वाकानी परत येऊ शकत नाही. त्यांना दोन मुले आहेत. ती माझ्या बहिणीसारखी आहे. आजही त्यांच्या कुटुंबाशी आमचे खूप जवळचे नाते आहे. माझी बहीण दिशा वकानी हिने मला राखी बांधली आहे. तिचे वडील आणि भाऊही माझ्यासाठी एक कुटुंब आहे. आम्ही १७ वर्षे एकत्र काम केले आहे”.
ते शेवटी म्हणाले, “तिच्यासाठी आता शोमध्ये परतणे कठीण आहे. लग्नानंतर महिलांचे आयुष्य बदलते. लहान मुलांसह काम करुन घर सांभाळणे त्यांच्यासाठी थोडे कठीण आहे. पण तरीही मी सकारात्मक आहे. कुठेतरी देव काहीतरी चमत्कार करेल आणि ती परत आली तर चांगली गोष्ट होईल असं वाटतं. काही कारणास्तव ती आली नाही तर शोसाठी मला दुसरी दयाबेन आणावी लागेल”.