सुष्मिता सेनच्या ‘ताली’ या वेबसीरिजच सर्वच स्तरातून कौतुक होतंय. या वेबसीरिजमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी वर्णी लावलेली पाहायला मिळाली. सर्वच कलाकारांचं व त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. मात्र या सगळयात अभिनेता सुव्रत जोशी भाव खाऊन गेला. सुव्रत जोशीने साकारलेल्या तृतीयपंथीची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. सुव्रतच्या अभिनयाने आजवर चाहत्यांच्या मनात घर केलं आहेच शिवाय सुव्रतचा सोशल मीडियावरील वावर व त्याच्या परखडपणे व्यक्त होणं ही प्रेक्षकांना विशेष भावत. (Suvrat Joshi On Veggies And Grocery Shopping)
अशातच सुव्रतच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतका मोठा कलाकार असूनही सुव्रतच व भाजी मंडईच विशेष नातं आहे. सुव्रतने बँकॉकमधील भाजी मंडईचा व्हिडीओ शेअर केला असून भाजी मंडई या त्याच्या आवडीच्या विषयावर भाष्य केलं आहे. सुव्रतने लिहीलं की, “जगात कुठेही गेलं की मला साद घालते ती तिथली मंडई. अगदी लंडनमध्ये असताना देखील हॅमरस्मिथ (Hammersmith) मार्केटमध्ये जाणे हा माझा दिवसातील अत्यंत आनंदाचा भाग. बऱ्याच लोकांना बॅगा, घड्याळे, कपडे, अत्तर या अशा गोष्टींची भुरळ पडते.”
“मला स्थानिक भाज्या, फळे, मसाले, फुले वगैरे यांची. एकदा माझ्या एका अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत होतो आणि विषय निघाला. तर मी तिला म्हटलं, मला कितीही लोक ओळखू देत, माझ्या आनंदासाठी मी शेवटपर्यंत मी भाजी बाजाराला जाणार. लोक खूप श्रीमंत अथवा प्रसिद्ध झाल्यावर स्वतःसाठी बोटी, बंगले घेतात…मी कदाचित स्वतःचा भाजी बाजार उभा करीन. प्रत्येक ठिकाणच्या भाजी बाजारात गेल्यावर तेथील लोकांच्या जगण्याविषयी, खाद्य संस्कृती विषयी जे साक्षात्कार होतात ते टुरिस्ट ब्लॉगवर मिळणाऱ्या सल्ल्यांमधील खानावळीत जाऊन होत नाहीत.”
पुढे सुव्रतने लिहीलं की, “एक गोष्ट नक्की की काही अपवाद वगळता प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या प्रकृतीनुसार आहार घेतात. तो सुयोग्य असतो. भारताइतके उत्कृष्ट शाकाहारी जेवण कुठेही मिळत नाही. त्यात भारत मला तरी एक नंबर वाटतो. पण म्हणून केवळ आपल्याकडेच फक्त शास्त्रीय पद्धतीने अन्नग्रहण होते हे काही खरे नाही. तसे ते जवळ जवळ प्रत्येक ठिकाणी होते. पुन्हा मांसाहारबद्दल आपल्या इथे अनेक अशास्त्रीय गैरसमज पसरवले गेले आहेत. शाकाहार उत्तमच! परंतु विशिष्ट मांस खाल्ले की स्खलन होते वगैरेला छेद देणाऱ्या गोष्टी ढळढळीतपणे दिसून येतात.”
“अन्यथा दिवसरात्र मांसाहार करणारे देश आपल्या तुलनेत अत्यंत आनंदी, शांततापूर्ण, सभ्य, शीलवान कसे आहेत? भूतान हे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण, थायलंडमध्ये देखील तोच अनुभव! असो. खऱ्या अध्यात्मिक प्रगतीसाठी भय, लज्जा, घृणा यापासून मुक्त होणे आवश्यक असते असे म्हणतात. विविध ठिकाणचे हे खाणे पिणे पाहिले, त्यातील काही करून पाहिले की आपले पूर्वग्रह काहीसे सैल नक्की होतात आणि भय,लज्जा किंवा घृणा याच्या थोडे पलीकडचे दिसते हे नक्की. त्या अर्थाने भाजी घेणे किंवा किडे खाऊन पाहणे हा माझ्यासाठी अध्यात्मिक अनुभव आहे.”