गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र या उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज होत आहे. मराठी कलाकारही यात मागे राहिली नसून तेदेखील गणेशोत्सवाच्या तयारीला लागली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील लाडकी अभिनेत्री सायली संजीवसुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. तिच्या घरी गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. (Sayali Sanjeev Ganeshotsav)
छोट्या पडद्यावरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री सायली संजीवला या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. छोटा पडदा गाजवल्यानंतर पुढे ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. सायलीने ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’ या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली असून ‘गोष्ट एका पैठणीची’ या तिच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सायलीने काही काळासाठी अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला असला, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते.
अभिनेत्री सायली संजीवच्या घरी अनेक वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापणा होत असून तिचे आणि गणरायाचे एक विशेष नातं आहे. सायलीने नुकताच ‘एबीपी माझा’शी संवाद साधला होता. ज्यामध्ये तिने तिचं गणपती बाप्पाशी कसं नातं आहे, याबद्दल सांगितले आहे. सायली म्हणते, “गणपती बाप्पा आणि माझं नातं मैत्रीचं आणि भावडांचं आहे. एकंदरीतच मी बाप्पामध्ये सर्व नाती एकत्र पाहते. आमच्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहेत. आमच्या गौरी-गणपती दोन्ही असतात. गौरींचे मुखवटेच आमच्याकडे 150 वर्षे जुने आहेत”.
हे देखील वाचा – दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ची आठ दिवसांमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई, पण चित्रपट बनवण्यासाठी नेमका किती खर्च लागला?
सायली स्वतः तिच्या घरातील गणपतीची प्रतिष्ठापना करते. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, “आठ वर्षांपूर्वी मी स्वत: बाप्पा बसवायला लागले, ही माझ्यासाठी कायम आठवणीत राहणारी गोष्ट आहे. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. आपल्याकडे असं म्हणतात की, मुली गणपती बसवत नाही. पण मी नऊवारी साडी, आणि साजश्रृंगार करुन बाप्पा बसवते.” सायलीला तिच्या वडिलांच्या आजारपणात गणरायाकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली असल्यामुळे बाप्पा तिच्या पाठीशी असल्याचे अभिनेत्रीला नेहमी वाटत असते.
हे देखील वाचा – “पैसे नाहीत त्याला…”, मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने लाखो रुपये थकवल्यामुळे शशांक केतकर भडकला, म्हणाला, “इंडस्ट्रीमधील मोठी नावं…”
अभिनेत्री सायली संजीव दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या तयारीला लागली आहे. यावर्षी तिचा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर असल्याचे तिने सांगितले आहे. (Sayali Sanjeev Ganeshotsav)