‘सुभेदार’ या चित्रपटाने साऱ्या प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली. ‘श्री शिवराज अष्टका’मधील हे पाचवं चित्र पुष्प असून यामध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा दाखवण्यात आली. चित्रपटात तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर यांना पाहणं रंजक ठरलं. इतकाच नव्हे तर चित्रपटातील इतर ही कलाकारांनी उत्तम काम केली आहेत. चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं, जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन सुरु होत तेव्हा अजय पुरकर यांनी एका मुलाखतीत मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केला. (Ajay Purkar On Marathi Language)
‘सुभेदार’ या चित्रपटानिमित्त ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखती अजय पुरकर यांनी मराठी भाषेच्या अभिमानाबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “आपल्या भाषेचा अभिमान आहे? तर हो. मी आजही विमानतळावर गेलो तरी मराठीत बोलतो. कारण याचं मी एक नेहमी विनोदी उदाहरण देतो, ते पण खरं आहे. एखादी फ्रेंच बाई आल्यानंतर ती फ्रेंचमध्येच बोलते की नाही? मग समोरच्याचा चेहरा बघण्यासारखा होतो की नाही? त्यामुळे तुम्ही पण त्यांचे चेहरे बघण्यासारखे करा. “
“बोलायचं, विमानातला माझा आसान क्रमांक काय आहे? समोरचा, येस सर? मग तुम्ही, मी मराठीत बोलतोय. तुम्हाला मराठी कळतं? तुला कळतं नाही ते तू मला सांग. मग मी तुझ्या भाषेत बोलतो. पण मी माझ्याच भाषेत बोलणार. इतर लोक त्यांची भाषा बोलायचं सोडतात का? नाही सोडतं. मग आपण का मराठी भाषा बोलणं सोडायचं?”
पुढे अजय पुरकर म्हणाले की, “रेस्टॉरंटला जाऊन का इंग्रजी भाषेत बोलतो? मला माझ्या भाषेत बोलता येतं. तुमच्याकडे अमुक-अमुक मिळेल का? हे विचारता येतं. त्या समोरच्याला सांगू दे मला मराठी येत नाही, मग मी बोलेन. हा जो अभिमान आहे, तो आपण टिकवला पाहिजे. मी प्रत्येक विमानतळावर मराठीत जाऊन बोलतो. मला तीच भाषा येते तर? या गोष्टी आपण एक महाराष्ट्रीय म्हणून त्याचा विस्तार केला पाहिजे. ज्या गोष्टीचा अभिमान आहे, त्या गोष्टीचा अभिमान पाहिजेच. थोडसं जर आपण बाहेर गेलो, तर तुम्ही ती संधी साधा.”