मराठी मालिकांमधून अनेक कलाकार घराघरात पोहोचले आहेत. छोट्या पडद्यावरुन त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. पण मालिकांत काम करणाऱ्या कलाकारांना अनेकवेळा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक तास चालणारं शूटिंग, कामाची पद्धत, त्याचबरोबर अनेक कलाकारांना हक्काचं मानधनदेखील मिळत नाही. याबद्दल अनेक कलाकारांनी अनेकदा भाष्य केलं आहे. अशातच आता छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्याला याबद्दलचा अनुभव आला आणि हा अभिनेता म्हणजे आशय कुलकर्णी. मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच आशय कुलकर्णी. काही दिवसांपूर्वीच त्याने एका मालिकेत काम केलं होतं. परंतु, निर्मात्यांनी त्याचं मानधन अद्याप अभिनेत्याला दिलं नाही या आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली.
आशयने यासंदर्भात वारंवार फोन, ई-मेल करुनही उत्तर मिळत नसल्याचं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आशयने याबाबत संताप व्यक्त करत आपलं मत मांडलं होतं. आशयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र ही पोस्ट लिहित असताना त्याने मालिकेचं नाव घेणं टाळलं. या पोस्टद्वारे त्याने निर्मात्यांना पैसे मिळण्याबाबत प्रश्न विचारले. आशयची ही पोस्ट अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि या पोस्टमुळे त्याला त्याचे थकलेले पैसे मिळाले आहेत.
आशयने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मिळाले! माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, हितचिंतक, तुमच्या पाठींब्यासाठी धन्यवाद”. दरम्यान, आशयने तरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, ईपी यांना वारंवार फोन, ईमेल केले. तरीही पैसे काही मिळाले नाही. आमच्याकडून रोज शूटला वेळेत येण्याची अपेक्षा असते, पण मग वेळेत पैसे देता का येत नाही?”. ही पोस्ट शेअर केली होती.
आणखी वाचा – “पैसे वेळेत देत नाहीत अन्…”, बहुचर्चित मराठी मालिकेच्या निर्मात्यांवर अभिनेत्याचे आरोप, नक्की मालिका कोणती?
नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेने आठशे भागांचा टप्पा पार केला. शिवाय आशयही या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत होता. त्यामुळे आशयने उल्लेख केलेली मालिका हीच असल्याची चर्चा होत आहे. मात्र सोशल मीडियावर या मालिकेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आशय सध्या सुख कळले मालिकेत काम करत आहे. आशय हा काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटात झळकला होता. तसेच त्याने झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेतही काम केलं आहे.