‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून सगळ्यांना मनसोक्त हसवणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. स्नेहल विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. कार्यक्रमातील तिचा वावर व विनोदीशैली यामुळे तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांना त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग वाटतो. त्यामुळे स्नेहललाही प्रेक्षकांकडून नेहमी प्रेम मिळत आलं आहे. स्नेहलनेही असाच तिच्या कुटुंबाचा किस्सा चाहत्यांसह शेअर केला आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमात तिच्या घरी बारश्यापासून ते मैतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी होत असल्याबाबत सांगताना तिने राहत्या घराचा किस्सा सांगितला.(Snehal told her home memories)
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून चर्चेत आलेली स्नेहल चाळीत राहते. मुंबईतील या चाळीतले तिचे सुखद अनुभव सांगत तिने तिच्या आयुष्यातली चाळं किस्स्यांच्या रुपात मांडली. “मी आता एक कलाकार आहे. टिव्हीवर दिसायला लागले तर लोकं मला विचारतात की तु अजून चाळीतच का राहतेस? मला या प्रश्नाचं हसू येतं. हा प्रश्न मला काहीसा वेगळाही वाटतो. मला कळत नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे!”
वाचा – स्नेहलचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता?(Snehal told her home memories)
आणखी वाचा – ठुमके, अदा अन्…; गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर तरुणाईचा उदंड प्रतिसाद
तसेच ती पुढे म्हणते, “ हे माझं घर आहे. मी अभिनेत्री आता झाले. अभिनेत्री म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आला असं नाही. माझी सुरूवात इथून आहे. इथली माणसं माझी आहेत. चाळ म्हंटलं, की जागा थोडी कमी असतेच. त्यामुळे चाळीत कोणताही कार्यक्रम असला तरी आमच्या समोरील जागेवर सगळं काही असायचं. माझे आई-बाबा अगोदरपासून जेवणाची ऑर्डर घेत. त्यामुळे कोणताही समारंभ आमच्याकडेच असायचं असं वाटायचं. त्यामुळे आमच्या चाळीतील प्रत्येकाचं बारश्यापासून ते मैतापर्यंत सगळं काही इथेच होतं. यात वेगळं असं काहीच नाही. शेवटी हा चाळीतला आपलेपणा आहे”.
“मी कॉलेजमध्ये असताना नाटकाच्या सरावासाठी जेव्हा आमच्याकडे जागा नसायची तेव्हा दुसरी जागा शोधण्यापेक्षा आमची हक्काची जागा हीच असायची. इथे आम्ही रात्रभर सराव करत स्पर्धेसाठी तयारी केली आहे. त्यामुळे चाळ नेहमीच माझ्यासाठी महत्त्वाची होती आणि पुढेही असेल”. स्नेहलने आतापर्यंतचा प्रवास हा इथूनच केला आहे त्यामुळे तिचं चाळीबरोबरचं असणारं नातं खूप अतूट आहे.