‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला तर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. या मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सुरुवातीला सागर-मुक्तामध्ये पाहायला मिळणारे वाद कमी झाले असून त्यांच्यात प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळत आहेत. सागर व मुक्ताच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाची गोष्ट सुरु असतानाच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून पोस्ट कऱण्यात आलेल्या या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Premachi Goshta New Promo)
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मुक्ता-सागराच्या प्रेमाच्या गोष्टीत सावनीने विरजण टाकलं असल्याचं पाहायला मिळत आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांचाही हिरमोड झाला आहे. सध्या मालिकेत होळी स्पेशल भाग पाहायला मिळत आहेत. होळीनिमित्त मालिकेत मुक्ता-सागरचा प्रेमळ अंदाज पाहायला मिळत आहे. मुक्ता व सागर यांच्यातील प्रेम होळीदरम्यान अधिक खुललेलं पाहायला मिळत आहे. रांगांमध्ये न्हाऊन गेलेले मुक्ता-सागरला एकत्र पाहून सावनीचा पारा चढलेला पाहायला मिळाला.
मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सागर मुक्ताला प्रेमाची कबुली देत मागणी घालताना दिसतो. त्यावेळी तिथे सावनी व आदित्यही असतात. सावनी मुद्दाम आदित्यच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करते. सावनी आदित्यला म्हणते, “तुझा पप्पा तुला विसरला आहे. तो त्याच्या नव्या बायकोबरोबर खुश आहे”. त्यानंतर सागर जेव्हा आदित्यला बघतो तेव्हा तो आदित्यची विचारपूस करायला त्याच्याजवळ येतो. तर त्यावेळी तिथे मुक्ताही उभी असते. मात्र आदित्य सागरला भाव देत नाही. तो म्हणतो, “तुमच्यासाठी महत्त्वाची ती तुमची नवीन बायको आहे”.
आदित्यचं बोलणं ऐकून सागर आदित्यला समजावण्याचा प्रयत्न करतो. सागर आदित्यला म्हणतो, “माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस. माझं मुक्तावर अजिबात प्रेम नाही”. हे ऐकून आदित्य तिथून निघून जातो. तर सागरचं बोलणं ऐकून मुक्ता पूर्णतः कोलमडून जाते. ती सागरजवळ येऊन त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते, “खरंच या सगळ्याला प्रेमाची गोष्ट समजत होते. यापुढे तुमची बायको नाहीतर सईची आई हे एकंच नातं माझ्यासाठी महत्त्वाचं असेल”. आता मुक्ता-सागरच्या या सुंदर नात्याला सावनीची लागलेली नजर काय वळण देणार हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल.