आपल्या नृत्यशैलीने अभिनेत्री मानसी नाईकने आजवर अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. नेहमीच ती अनेक रील्स, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांमधून मानसी नाईक हिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सतत चेहऱ्यावर हसू ठेवून असणारी ही अभिनेत्री मात्र तिच्या खासगी आयुष्यामध्ये अपयशी ठरली. मानसीचा घटस्फोट झाल्याची बातमी तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली. यानंतर आता मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे, असं अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (Manasi Naik In Love)
मानसीने नुकतीच ‘अमृता फिल्म’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्रीने तिच्या आयुष्याबाबत बरंच भाष्य केलं. दरम्यान अभिनेत्रीने या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील नवीन प्रवासाबाबतही खुलासा केला. मानसी ही घरेलू स्वभावाची मुलगी आहे. आजवर तिने कायमच तिच्या कुटुंबाला अधिक प्राधान्य दिलं आहे. अशातच अभिनेत्रीने या मुलाखतीदरम्यान घर, कुटुंबाविषयी बोलताना नव्याने पुन्हा एकदा प्रेमात पडली असल्याची जाहीर कबुली दिली आहे.
घरपण, घर, कुटुंब याबाबत बोलताना मानसी म्हणाली, “घराला घरपण देणारी ही एक स्त्री असते. आणि मी खूप भाग्यवान आहे की, हा जन्म एका स्त्रीचा आहे. या जन्मात मी आई-बाबांच्या पोटी एक मुलगी म्हणून जन्म घेतला आहे. भावाची बहीण झाले, माझ्या आयशुची मानू आत्या आहे, आणि अर्थात प्रेक्षकांची लाडकी हिरोईन आहे. आणि हिरोईन बनणं हे सर्वांच्या नशिबात नसतं. आणि आता अट्टाहासाने मी पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. पुन्हा एकदा स्त्री म्हणून जगायचं आहे आणि या जन्माला वाया घालवणार नाही. हा एकूणच प्रवास खूप सुंदर आहे. अडचणी या येतात, त्या अडचणींना हाय, हॅलो, बाय असं करायचं आणि पुढे व्हायचं”.
पुढे मानसी म्हणाली, “प्रेम खूप छान असतं. प्रेमाला कोणतीही परिभाषा नसते. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी असते. माझ्यासाठी ही व्याख्या खूप महत्त्वाची आणि मोलाची आहे. प्रेमात ते प्रेम योग्य आहे की नाही हे ओळखायला हुशारी लागते. आणि जे काही करायचं आहे ते आता डोळे बंद करून नाही तर डोळे उघडून करायचं. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. त्यामुळे प्रेमात पडा असं मी आवर्जून सांगते”.