अभिनेत्री प्रिया बापट ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर प्रियाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. अनेक मालिका, चित्रपट व नाटक या माध्यमांमधून प्रियाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाशिवाय आता अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्राकडे तिची वाटचाल सुरु केली आहे. सध्या प्रिया नाटकांच्या निर्मितीकडे वळली आहे. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान अभिनेत्रीला बरेचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. (Priya Bapat Answers To Her Fan)
प्रिया बापट व उमेश कामत ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. प्रिया व उमेश यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. कायमच सिनेसृष्टीत सक्रिय असणाऱ्या जोडींच्या यादी या जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. अभिनेत्रीला नेहमीच प्रेग्नन्सीबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रेग्नन्सीबाबतच्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे. “लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत, तर बाळाबद्दल तुला विचारलं जात असेल, ते प्रश्न कसे हाताळतेस?” असा प्रश्न ‘हॉटरफ्लाय’च्या मुलाखतीत विचारण्यात आला असता अभिनेत्रीने एक किस्सा सांगितला.
हा किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाली की, “मी व उमेश एकत्र एक नाटक करत आहोत. नाटकानंतर अनेक लोक भेटायला येतात, एकेदिवशी एक काकू आल्या आणि म्हणाल्या, ‘आता आम्हाला गुडन्यूज पाहिजे’. मी म्हणाले ‘आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुडन्यूज मिळाली ना’. पण त्या म्हणाल्या ‘तू बाळाचा विचार कधी करणार’. मी उत्तर देईस्तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या. मग मी त्यांना म्हणाले, काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका,” असं म्हणत प्रियाने ती वेळ सांभाळली.
पुढे प्रिया म्हणाली, “नुकताच मी पोलका डॉट प्रिंटचा काळ्या रंगाच्या ड्रेसवरचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर ‘प्रिया बापट प्रेग्नंट आहे’, अशा कमेंट्स होत्या. अनुष्का शर्माने तिच्या प्रेग्नन्सीवेळी पोलका डॉट ड्रेस घातला होता, त्यामुळे मी घातला तर त्यांच्यामते मी प्रेग्नंट आहे,” हा देखील एक अनुभव तिने यावेळी बोलताना शेअर केला.