स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ने गेल्या ५ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अनेकदा मालिकेच्या कथानकावर टीका झाली, मात्र तरीही प्रेक्षकवर्ग कमी झालेला नाही. गेल्या काही काळापासून मात्र टीआरपीचे गणित बिघडले होते. प्रेक्षकांनी मालिका रटाळ झाली आहे, आता बंद करा अशी टीकाही केली. काही महिन्यांपूर्वी मालिकेची वेळ बदलण्यात आली. दुपारी २.३० वाजताची वेळ ‘आई कुठे काय करते’ मालिकेला देण्यात आली. पण, आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. मालिकेच्या निरोपानिमित्त ‘इट्स मज्जा’ने नुकताच ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमबरोबर संवाद साधला. (Aai Kuthe Kay Karte Serial Remake)
यावेळी ‘आई कुठे काय करते’च्या दिग्दर्शकांबरोबर ‘इट्स मज्जा’ बरोबर गेल्या पाच वर्षांतीळ काही खास क्षण शेअर केले. यावेळी त्यांना मालिकेच्या रिमेक बद्द प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत ‘आई कुठे काय करते’चे दिग्दर्शक रवी करमरकर यांनी असं म्हटलं की, “रिमेक बद्दल अजून तरी काही विचार केलेला नाही. पण रिमेक करायला आवडेल. चॅनेल म्हणालं तर नक्की या मालिकेचा रिमेक करायला मला आवडेल”. मालिका सुरू झाल्यानंतर अगदी अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पहिल्या प्रोमो पासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर याचा हिंदी रिमेक करण्यात आला आणि स्टार प्लसवर ‘अनुपमा’ ही मालिका सुरू करण्यात आली. मालिकेचं कथानक सारखेच असल्यामुळे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही. आई कुठे काय करते ही मालिका ‘श्रीमोयी’ या बंगाली मालिकेचा रिमेक आहे ही मालिका स्टार जलसावर प्रदर्शित होत होती.
दरम्यान, पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेक्षकांनी देशमुख कुटुंबातले सुखाचे क्षण आपले मानून आनंद व्यक्त केला तर संघर्षाच्या काळात काळजीरूपी साथदेखील दिली. प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमामुळं ही मालिका प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनामनांत पोहोचली.