तुम्हाला दहा वर्षांपूर्वी दुरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणारी ‘शक्तिमान’ ही मालिका नक्कीच आठवत असेल ना… ‘शक्तिमान’ हा पहिला सुपरहीरो होता जो शत्रुंचा नाश करताना लहान मुलांना एक नवीन संदेश देत होता. याच कारणामुळे ‘शक्तिमान’ लहान मुलांमध्येच नव्हे तर मोठ्यांमध्येही विशेष लोकप्रिय झाला होता. १३ सप्टेंबर १९९७ रोजी शक्तिमान या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. तब्बल आठ वर्षे ही मालिका यशस्वीरित्या छोट्या पडद्यावर सुरु होती. ‘शक्तिमान’ ही “सुपरहीरो” मालिका दूरदर्शनवरील एकुलती एक अशी मालिका आहे की जिने ४०० हून अधिक भाग पूर्ण केले. (Mukesh Khanna Shaktimaan Serial Rerun)
आठ वर्षे चाललेली ही मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेवर सिनेमा येणार किंवा ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा अनेक चर्चा होत होत्या. अनेक वर्षे ‘शक्तिमान’ प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. मात्र, ‘शक्तिमान’ परत येत असल्याचे संकेत मुकेश खन्ना यांनी दिले आहेत. रविवारी मुकेश खन्ना यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘शक्तिमान’ परत येणार असल्याचं सूचित केलं आहे. मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक जुना फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे.
“आता त्याच्या परतीची वेळ आली आहे. आपला पहिला भारतीय सुपर टीचर-सुपरहीरो. आजच्या मुलांवर अंधार आणि वाईट शक्तींचं सावट वाढत चाललं आहे. त्यामुळे ‘शक्तिमान’ परत येत आहे एक संदेश आणि उपदेश घेऊन… आजच्या पिढीसाठी. त्याचं स्वागत करा.” असं म्हणत मुकेश खन्ना यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये ‘शक्तिमान’ त्याच्या स्टाईलनं गोल गोल फिरत येतो. त्याच्या आजूबाजूला भगतसिंग, सुभाषचंद्र बोस या क्रांतिकारकांचे फोटो आहेत.
‘शक्तिमान’ ‘टीजरमध्ये ‘आझादी के दिवानों ने जंग लढी’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. लवकरच, ‘शक्तिमान’चे चाहते त्यांच्या बालपणीच्या आणि भारताच्या पहिल्या सुपरहिरोला पुन्हा पाहू शकतील. मात्र, लोकांमध्ये तो कधी प्रसारित होणार हे अद्याप कळलेले नाही. ९० च्या दशकात ‘शक्तिमान’ च्या रुपात पहिला सुपरहिरो मिळाला होता. १९९७ ते २००५ या दरम्यान ‘शक्तिमान’ मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. ९० च्या दशकात या मालिकेने लहान मुलांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं.