चित्रपट जगतात अंमली पदार्थांचा व्यापार प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. ड्रग्जच्या प्रकरणात चित्रपटातील कलाकारांची नावे येणे ही आता सामान्य गोष्ट राहिलेली नाही. इतकंच नाही तर अनेक कलाकारांनी ते एकेकाळी ड्रग्ज घेत असल्याचं उघडपणे जाहीर केलं आहे. अशातच आता एका अभिनेत्यानेही त्याच्या ड्रग्ज वापराबद्दल भाष्य केलं आहे आणि हा अभिनेता म्हणजे प्रतीक बब्बर. प्रतीक हा दिवंगत दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आहे. खूप कमी वयातच त्याला हे व्यसन जडलं होतं. या व्यसनातून कालांतराने तो बाहेर पडला. प्रतीक २०१३ मध्ये ड्रग्जच्या व्यसनातून मुक्त झाला. (Prateik Babbar On Drugs)
प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या व्यसनाशी लढा देण्याबद्दल सांगितले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतरच त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. प्रतीकला इंडस्ट्रीत १६ वर्षे झाली आहेत. मात्र इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच ड्रग्जचं व्यसन होतं, असं प्रतीकने सांगितलं. याबद्दल बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला की, “लोकांना वाटतं की, ‘हा फिल्म इंडस्ट्रीत आला, त्याला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आणि मग त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली’ पण तसं काही नाही. माझ्याबाबतीत हे खरं नाही. मी १२-१३ वर्षांचा होतो, तेव्हपासून मी ड्रग्ज घेत होतो”.
यापुढे तो असं म्हणाला की, “दुर्दैवाने, माझं संगोपन वेगळ्या पद्धतीने झालं आणि माझी कौटुंबिक परिस्थिती थोडी गुंतागुंतीची होती. त्यामुळे मी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. चित्रपटांमधील प्रसिद्धी आणि पैसा मला ड्रग्जकडे घेऊन गेलं असं नाही. मी लहानपणापासूनच ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. ड्रग्जचा माझ्यावर परिणाम झाला आणि अजूनही होतो. खासकरुन नात्यांवर परिणाम होतो. ड्रग्जचा संबंध आघाताशी (ट्रॉमा) आहे. जोपर्यंत तुम्ही ट्रॉमातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम नात्यांवर आणि आयुष्यातील इतर गोष्टींवर होत राहील”.
यापुढे त्याने यातून बाहेर येण्याबद्दल त्याच्या प्रियसीचे आभार मानले. याबद्दल् तो असं म्हणाला की, “आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला गोष्टी चांगल्या करण्यासाठी काम करावं लागतं. मीही अनेक वर्षांपासून ते करत आहे. माझी होणारी पत्नी प्रिया बॅनर्जी मला सुधारण्यासाठी खूप मदत करत आहे. तिला काहीच बदलण्याची गरज नाही, ती परफेक्ट आहे; मात्र आम्ही एकमेकांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतोय. आयुष्य हे असंच आहे आणि पुढे जावंच लागतं”.