मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबू तावडे या दोघीही सख्या बहिणी आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोंमधून त्यांच्यात असलेलं बाँण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. अलीकडेच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. (Titeekshaa Tawde and Khushboo Tawde)
सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या बहिणींच्या जोडीत ही जोडी विशेष ओळखली जाते. सध्या दिवाळी निमित्त ही जोडी विशेष चर्चेत आली आहे. मूळच्या डोंबिवलीकर असणाऱ्या या जोडीच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी हे डोंबवलीकर डोंबिवली मधील फडके रोड येथे आवर्जून जातात. मात्र यंदाची फडके रोडवरील दिवाळी ही तितिक्षा व खुशबू साठी खास असल्याचं त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे. दोघींनी एकत्र फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली आहे.
तितिक्षा व खुशबूने दिवाळी पहाटसाठी पारंपरिक लूक केलेला या फोटोंमध्ये पाहायला मिळाला. बरं यावेळेला त्यांनी फडके रोड येथील दिवाळी पहाटला सेलिब्रिटी म्हणून हजेरी लावली होती. “आजवर दिवाळीचा पहिला दिवस डोंबिवलीमध्येच असायचा, पण यावर्षी दिवाळी पहाटला फडके रोडवर जाणं आम्हा दोघींसाठी खूप स्पेशल होतं. जिथे शाळा सुटल्यावर उनाडक्या करायचो तिथेच कालचा कार्यक्रम झाला. खूप खूप ग्रेटफूल” असं म्हणत तितिक्षाने ही पोस्ट शेअर केली आहे.
खुशबू व तितिक्षा ही बहिणींची जोडी मराठी टेलिव्हिजनवर चांगलीच प्रसिद्ध आहे. त्या दोघींचं एकमेकींवर नितांत प्रेम आहे. दोघीही एकमेकींच्या सख्खा बहिणी असल्या तरीही त्या कायमच मैत्रिणीसारख्या राहतात. दोघी एकमेकांना वेळोवेळी सरप्राईज ही देताना पाहायला मिळतात. शिवाय ते एकत्र अनेक रील्स, फोटो शेअर चाहत्यांसह शेअर देखील करतात.