सध्या दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २’ची चांगलीच चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चेत राहिला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागानंतर चाहते दुसऱ्या भागांची आतुरतेने वाट बघत होते. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाची कथा, संवाद पात्र व गाणी यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. खूप कमी दिवसांत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागातील गाण्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. ‘सामी’, समंथा रुथ प्रभूवर चित्रित केलेलं ‘ऊ अंतवा’ ही गाणी विशेषतः चर्चेत राहिली. मात्र दुसऱ्या भागातील गाणी खास कमाल करु शकली नाहीत. (rashmika mandana on peelings song)
अल्लू अर्जुनच्या या चित्रपटामध्ये रश्मिका मंदना ही मुख्य भूमिका साकारताना दिसली. श्रीवल्ली असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका यांच्यावर पिलिंग हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. जबरदस्त डान्स स्टेप, एनर्जेटिक गाण्याला मात्र प्रेक्षकांची म्हणावी तितकी पसंती मिळाली नाही. या गाण्यामधील डान्स स्टेप प्रेक्षकांना पसंत पडल्या नाहीत. अशातच आता या गाण्याबद्दल खुद्द रश्मिकाने भाष्य केले आहे.
रश्मिकाने नुकतीच ‘Galatta plus’ बरोबर संवाद साधला. यावेळी ती ‘पीलिंग्स’ या गाण्याबद्दल म्हणाली की, “हे गाणं प्रदर्शनाच्या काही दिवसांपूर्वी चित्रित झाले होते. पाच दिवसांत हे गाणं चित्रित झाले होते. चित्रीकरणाच्या वेळी मी अल्लू अर्जुन सरांच्या डोक्यावर डान्स करत आहे असं वाटलं. मला लिफ्टिंगची भीती वाटते. लोक मला लिफ्ट करत होते त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. या गाण्यामध्ये मला खूप उचलून घेण्यात आलं होतं”.
पुढे ती म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून लोकांचे मनोरंजन करणे माझं काम आहे. दिग्दर्शकाची पोचपावती मिळावी म्हणून मी काम करते. माझ्या पोटापाण्याचे साधन आहे. जर मी माझ्या भूमिकांपासून लांब गेले आणि सतत विचार करु लागले तर मी टाइपकास्ट होईन आणि मला हे नको आहे”. दरम्यान या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.