सध्या सर्वत्र ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुन व रश्मिका मंदना यांची मुख्य भूमिका असलेली बघायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेचच या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली. मात्र चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आधी प्रीमियरच्या वेळी हैद्राबाद येथील संध्या थिएटर येथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच तिची दोन्ही मुलं जखमी झाली होती. या प्रकरणी अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटकही केली होती. मात्र नंतर काही काळातच अभिनेत्याला अटकपूर्व जामीनदेखील मंजूर झाला. दरम्यान एक मुलगा रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (sukumar meet injured shreeteja)
दरम्यान मुलगा रुग्णालयात भरती झाल्यानंतर अल्लू अर्जुन अद्याप त्याला भेटू शकला नाही. मात्र अल्लू अर्जुनच्या वडिलांनी श्री तेजाची भेट घेतली. दरम्यान आता त्यानंतर ‘पुष्पा २’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलाची भेट घेतली. याबद्दलची माहिती सुकुमार यांचे स्पोकपर्सन सुरेश यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर दिली. त्यांनी लिहिले की. “दिग्दर्शक सुकुमार हे श्रीतेजला भेटायला रुग्णालयात पोहोचले. त्यांच्या पत्नीने कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत केली आहे”.
दरम्यान अल्लू अर्जुनच्या वडिलांनीदेखील जखमी श्रीतेजची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, “मी आताच श्रीतेजाला आयसीयूमध्ये भेटलो आहे. त्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांशी मी बोललो आहे. गेल्या १० दिवसात मुलाची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, परंतु यास अधिक वेळ लागू शकतो. त्याच्या उपचारांसाठीची सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत. मी कृतज्ञ आहे की सरकारनेदेखील ही परिस्थिती सामान्य होण्यास मदत करण्यासाठी पाऊल टाकलं आहे”.
अल्लू अर्जुननेदेखील चेंगराचेंगरीमध्ये मृत पावलेल्या रेवतीसाठी एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली होती. व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला की, “मृत महिलेच्या कुटुंबाला तो स्वतः प्रत्यक्षात जाऊन भेटणार आहे. या कठीण प्रसंगी महिलेचे कुटुंबं एकटे नाही. मी त्यांच्याबरोबर असणार आहे. कुटुंबासाठी जे काही करता येईल ते मी सगळं करेन. मी मृत महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच उपचार व औषधांचा सर्व खर्चदेखील करणार आहे”. अल्लू अर्जुन संबंधित मुलाची भेट घेण्यासाठी कधी जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.