South Korean Actress Death : ‘ब्लडहाउंड्स’ आणि ‘द मैन फ्रॉम नोव्हेयर’ मधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी दक्षिण कोरियाची प्रसिद्ध अभिनेत्री किम से-रॉन हिचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. १६ फेब्रुवारी रोजी २४ वर्षीय अभिनेत्री सीओंग्सु-डोंग, सोल येथे तिच्या घरी मृत अवस्थेत आढळली. दरम्यान, अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झाले नाही. पोलिसांच्या अहवालानुसार किम से-रॉनचा एक मित्र तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा किमकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्रासलेल्या मित्राने अधिकाऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली. यानंतर केलेल्या तपासणीत दुपारी अभिनेत्रीचा मृत्यू तिच्या राहत्या घरीच सापडला. तिच्या मृत्यूमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच इंडस्ट्रीलाही धक्का बसला आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने कोरियन माध्यमांना सांगितले की, “आम्हाला अद्याप कोणत्याही प्रकारच्या गडबडीचे पुरावे मिळाले नाही आहेत, परंतु आम्ही अभिनेत्रीचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेत आहोत”. अभिनेत्रीने अखेर जानेवारीत इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने स्वतःचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. किम से-रॉनने २००९ मध्ये ‘अ ब्रँड न्यू लाइफ’ द्वारे पदार्पण करुन लोकप्रियता मिळवली. तिने ‘द मैन फ्रॉम नोव्हेयर’ (२०१०) मध्ये जोरदार कामगिरी केली. ‘द नेबर्स’ (२०१२), ‘हाय! स्कूल-लव ऑन’ (२०१४), ‘सीक्रेट हीलर’ (२०१६) आणि नुकत्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘ब्लडहाउंड्स’ (२०२३) सारख्या प्रकल्पांमध्ये काम केले आहे.
दरम्यान, २०२२ मध्ये झालेल्या घटनेनंतर अभिनेत्रीच्या कारकीर्दीला धक्का बसला. तिची कार रेलिंग आणि ट्रान्सफॉर्मरशी धडकली. यामुळे तिला ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात २० दशलक्ष व्हॉन (13,८५०) दंड ठोठावण्यात आला. एप्रिल २०२३ मध्ये तिने स्टेज प्लेमधून इंडस्ट्रीत परतण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोग्याच्या समस्यांमुळे तिने यातूनही माघार घेतली.