Soham Bandekar Wedding Rituals : गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या उत्साहात रंगताना दिसत होती. दोघांनाही चाहत्यांकडून लग्नाबाबत सतत शुभेच्छा मिळत असल्या तरी त्यांनी आतापर्यंत त्यांच्या एकमेकांबरोबरच्या कोणत्याही अधिकृत पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या नव्हत्या. मात्र अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून, त्यांच्या लग्नसोहळ्याची धडाकेबाज सुरुवात झाल्याचे दृश्य आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
नुकतेच ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या सेटवर पूजाचे केळवण मोठ्या सुंदर वातावरणात आणि सहकलाकारांच्या उपस्थितीत पार पडले. कलाकारांनी केलेल्या या पारंपरिक विधींचे फोटो आणि व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले. यानंतर पूजाचा मेहेंदी सोहळा देखील पार पडला असून, तिच्या हातावर सोहमच्या नावाची मेहेंदी रंगल्याचे फोटो स्वतः पूजानेच सोशल मीडियावर शेअर केले. या पोस्टवर तिने “सेहरा सजाके रखना” असे लिहीत सोहमला टॅग केले. त्यावर सोहमने प्रेमळ रिप्लाय देत म्हटलं, “रेडी राहा पूजा बिरारी… can’t wait to see you” असे म्हणत आपला आनंद आणि उत्साह व्यक्त केला.
आणखी वाचा – लग्नात गैरहजर पण…; लग्नानंतर लाडक्या भावाला अंकिता वालावलकरचा सल्ला, म्हणाली, “जीवनात कितीही बदल झाले तरी…”
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या आणखी एक व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे. लालबागमधील माजघरमध्ये सोहमचे केळवण मोठ्या थाटामाटात पार पडले असून, हा व्हिडीओ माजघरच्या सोशल मीडिया अकॉउंटवर शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बांदेकर कुटुंबात एकाच वेळी दोन लगीनघाई सुरू असल्याचे दिसत आहे. सोहमसह त्याची बहीण निकिताचाही लग्न जवळ आलं असून, दोघांचं केळवण एकत्रितपणे साजरं करण्यात आलं. संपूर्ण बांदेकर कुटुंब या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
याशिवाय बांदेकरांच्या घरी मेहेंदीचा धम्माल कार्यक्रमही रंगला. पूजाच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांकडून भरभरून शेअर आणि लाईक केले जात आहेत. सोहम–पूजाच्या लग्नाची रंगत आणि त्यांचा एकमेकांबद्दलचा आनंद पाहून चाहत्यांनी त्यांना प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





