Bigg Boss Marathi Season 5 Update : ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाचे बिगुल वाजले असून धमाकेदार ग्रँड प्रीमियर सोहळ्याने यंदाच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांचा सहभाग आहे. यंदाच्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करत आहे. रितेश देशमुखने बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपली छाप सोडली. विजेता ठरण्यासाठी, टास्क जिंकण्यासाठी शह-कटशह, ठस्सनही जोरात असणार आहे. याची झलक ग्रँड प्रीमियरच्या एपिसोडमध्ये दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती आणि ही उत्सुकता अखेर संपली.
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. या घरातील स्पर्धकांच्या एन्ट्रीबर ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांनी टिप्पणी केली आहे. ‘बिग बॉस’च्या गेल्या पर्वाचा स्पर्धक उत्कर्ष शिंदेने सुरज चव्हाणच्या एन्ट्रीवर वक्तव्य केलं आहे.
उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. उत्कर्षने सुरजचा फोटो शेअर करत त्याच्याबद्दल असं म्हटलं आहे की, “कंटस्टंट (स्पर्धक)छान किंवा वाईट ठरवण्यात मज्जा नाही. हा (सुरज चव्हाण) असाच रॉ, फ्री, मोकळा, निर्भीड खेळला तर बऱ्याच जणांना याला सांभाळायचं कसं हे कळणार नाही. त्यामुळे सुरज बिग बॉसमध्ये मज्जा आणेल. हे रसायन वेगळं आहे”.
यंदाच्या ‘बिग बॉस’ मराठीच्या सीझनमध्ये चार सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन:श्याम दराडे यांचा समावेश आहे. आता, ग्रँड प्रीमियरलाच कलाकार विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असा वाद झाल्याने बिग बॉसच्या घरात काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.