Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : ज्येष्ठ गायक व गझलकार पंकज उधास यांच्या निधनाने संपूर्ण संगीतक्षेत्र व चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दीर्घ आजारपणामुळे त्यांनी वयाच्या ७२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. आज त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाचे वृत्त जाहीर करण्यात आले. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये गायक सोनू निगम तसेच अन्य कलाकारांनी पंकज यांचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंकज यांच्या समोर आलेल्या अचानक निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. सोनूने पंकज यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या बालपणातील एक महत्त्वाची व्यक्ती आज आपल्यात नाही. श्री. पंकज उधासजी. तुम्ही आमच्या नेहमी लक्षात राहाल. तुम्ही आता नाही आहात या भावनेने मी तळमळत आहे. नेहमी माझ्याबरोबर राहिलात त्यासाठी धन्यवाद. ओम शांती”, असे लिहून त्याने आपले मन मोकळे केले आहे. सोनूच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तसेच गायक राहुल देशपांडे यानेही पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “त्यांचा दयाळूपणा, प्रेम व करुणेने आम्हा सर्वांना मनापासून स्पर्श केलं आहे. त्यांचं संगीत आणि त्यांच्यातील सच्चा माणूस नेहमी स्मरणात राहील”, असे म्हणत त्याने श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अनुप जलोटा यांनी, “संगीत क्षेत्रातील महान व्यक्ती आणि माझे मित्र पंकज उधास हे आपल्यात नाहीत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबीय व प्रियजनांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करत आहोत” असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है’ ‘और आहिस्ता’ अशी बहारदार गाणी पंकज उधास यांनी आपल्याला दिली आहेत. आजही ही गाणी प्रेक्षकांच्या ओठी आहेत. या गाण्यांचे बोल व पंकज यांचे सुर यामुळे सुरेल अशी गाणी प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत.