हिंदी मनोरंजन सृष्टीमधून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. गेली अनेक वर्ष आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वाला दु:खद धक्का बसला आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वचजण पंकज उधास यांच्या गझलांचे चाहते आहेत.
पंकज उधास यांच्या गझलां इतकीच त्यांची प्रेमकहाणीदेखील रंजक आहे. पंकज उधास यांनी आंतरधर्मीय विवाह केला असून त्यांच्या प्रेमकथेत त्यांच्या शेजाऱ्याची महत्वाची भूमिका असल्याचे म्हटले जाते. पंकज उधास यांच्या शेजाऱ्यानेच पंकज उधास यांची पत्नी फरीदाशी पहिल्यांदा ओळख करून दिली. त्यावेळी पंकज उधास हे पदवीचे शिक्षण घेत होते. तर फरीदा या एअर हॉस्टेस होत्या.
एका शेजाऱ्याने घडवून आणलेल्या भेटीतून पंकज व फरीदा यांची मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या. सतत एकमेकांबरोबर वेळ घालवल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांमध्ये धर्माचा मोठा अडसर होता. पंकज उधास हे धर्माने हिंदू होते, तर फरीदा या पारशी कुटुंबातील होत्या. दोघांच्या भिन्न धर्मामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
आणखी वाचा – गझल पोरकी झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, वयाच्या ७२व्या वर्षी जगाचा निरोप
पंकज व फरीदा यांच्या नात्याने पंकज यांचे कुटुंब खूश होते. पण फरीदाचे कुटुंब त्यांच्या लग्नावर नाराज होते. मात्र, दोघांच्या कुटुंबियांच्या संमतीशिवाय संसार थाटायचा नाही असं पंकज उधास यांचे म्हणणे होते. त्यामुळे दोघांनीही ठरवलं की, दोन्ही घरच्यांची सहमती असेल तेव्हाच लग्न करायचं. अशातच काही काळानंतर फरीदाच्या घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि मग दोघांनीही लग्न केले.
पंकज उदास यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी व दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, पंकज उधास यांच्या पश्चात दोन मुली असून त्यांचे नाव रेवा व नायाब असं आहे.