अनेक कलाकारांना कायमच ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो. अशातच एक मराठमोळी अभिनेत्री ट्रॉलींगची शिकार झाली होती. अभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकर काही दिवांपासून चर्चेत होती. जिम करताना शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ती नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकली होती. अशातच आता अभिनेत्रीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतं त्यांना फटकारलं असल्याचं पाहायला मिळत आहे. (Ketaki Mategaonkar Answer To Trollers)
इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “प्रिय प्रेक्षकहो, कधीकधी माझ्यासारख्या शरीराच्या लोकांनाही बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. किती बारीक आहेस गं, अजून लहान मुलींचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळी भेटलो तेव्हा छान बारीक होतीस, आता पोट सुटलंय का जरा? नातेवाईक असो, वा ऑफिसमधील सहकर्मचारी असो. आपल्याला नेहमी अशा वाक्यांना सामोरं जावं लागत. मी एवढं म्हणेन यामध्ये मी तुझ्याबरोबर आहे. पण, तुमच्या शरीराचा अभिमान बाळगा. तुम्ही सुंदर, अद्वितीय आहात. त्या विशिष्टतेला महत्त्व द्या, ते दिलेले चांगले. जर एखादा डॉक्टर, पोषणतज्ञ वा पात्र कोणीही असेल किंवा तुमचे पालक मित्र ज्यांना तुमची मनापासून काळजी आहे, ते तुम्हाला सांगतात, त्यांचे ऐका! अशी व्यक्ती नाही जी तुम्हाला नीचा दाखवू इच्छिते ज्याने तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटेल. प्रिय ट्रोलर्स, शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे” असं म्हणत तिने चांगलंच खडसावलं.
यापुढे केतकीने लिहिलंय, “मी तुमच्या भाषेत skinny (हाडांचा सापळा) बारीक आहे, हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक आहेत तशी मी सुद्धा आहे बारीक. तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं. थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल!. पण म्हणून रोगी आहे का? तर अजिबात नाही. व्यायाम किंवा जिम हे फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीक. पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या बॉडी पार्टसवर अश्लील कमेंट करणं याला तुम्ही स्वात्रंत्र्य म्हणता का? असंही ती म्हणाली.
पुढे तिने लिहिलंय, “आम्ही कलाकारही माणसं आहोत. एकाद्या जागी जखम झाली तिथून रक्त आलं की आम्हालाही दुखतं. तुम्हाला सुद्धा घरात आई असेल, बहिणी असतील. याचा विचार करा आणि काही लोक ज्यांना खरेच वैद्यकीय प्रॉब्लेम असतील त्या व्यक्तीचा विचार अधिक करा. कल्पना करा की तुम्ही त्यांना कोणत्या भयानक मानसिक अवस्थेत टाकत आहात. थोडे दयाळू आन जागे व्हा. थोडी सहानुभूती बाळगा. माझ्या सर्व प्रिय, सर्वात मौल्यवान चाहत्यांसाठी, तुमच्या निरंतर प्रेमाबद्दल, निष्ठेला पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी जशी आहे तशीच माझा स्वीकार केल्याबद्दल. मी तुमच्या कमेंट्स वाचत आहे आणि तुम्ही मला दाखवलेल्या समर्थनामुळे मी पूर्णपणे भारावून गेले आहे” असं म्हणत ती भावुक झाली.
“मी नेहमीच एक कलाकार म्हणून वा एक व्यक्ती म्हणून जास्तीत जास्त चांगलं होण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा, तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत राहीन” असं म्हणत तिने समर्थकांचे आभार मानले आहेत.