अभिनेत्री क्रांती रेडकरने आजवर तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य केलं आहे. अभिनयाव्यातिरिक्त ती चर्चेत असते ते म्हणजे तिच्या रिल व्हिडीओमुळे. अभिनेत्री नेहमीच तिचे व लेकींबरोबरचे हटके व मजेशीर रिल्स शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. आता प्रेक्षकही क्रांतीसह तिच्या लेकींचे खूप मोठे फॅन झाले आहेत. क्रांतीने शेअर केलेल्या लेकीच्या व्हिडीओवर प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. (Kranti Redkar On Daughter)
क्रांती व तिच्या लेकींचं घट्ट बॉण्ड असलेलं पाहायला मिळतं. क्रांतीने आजवर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केले असले तरी तिने अद्याप त्यांचा चेहरा दाखवलेला नाही. कायमच ती त्यांचे पाठमोरे फोटो शेअर करताना दिसते. अशातच अभिनेत्रीच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लेकीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त तिने ही खास पोस्ट शेअर केली आहे. यांत अगदी तान्ह्याला बाळांना घेऊन क्रांती व तिचा पती समीर वानखेडे पाहायला मिळत आहे.
ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे की, “छबिल गोडोत आज पाच वर्षांच्या झाल्या आहेत. वेळ निघून गेली असं मी म्हणू शकत नाही, कारण तुम्हा दोघींनी मला हजारो क्षण आठवण्यासाठी व जपण्याची पुरेशी कारणे दिली आहेत. खूप हसणं, रात्रीची झोपमोड, तुमचे घाणेरडे डायपर यातील प्रत्येक भाग मोलाचा आहे, त्या एका मिठीसाठी तसेच काळजीसाठी तुम्ही दोघी मला हव्या आहात. कधी कधी मला प्रश्न पडतो की, तुम्ही दोघी माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करता का? आपल्या मम्मीप्रमाणे नेहमी आनंदी, मजेदार रहा” असं क्रांती म्हणाली.
यापुढे क्रांती म्हणाली, “पदवी किंवा भौतिक गोष्टी मिळविण्यासाठी या पृथ्वीवर आपला वेळ घालवू नका, एक चांगला माणूस, दयाळू माणूस बनण्याकडे लक्ष द्या, बाकीचे तुमचं अनुसरण करतील. दोन चार वर्षांनंतर माझ्या बाळांनो तुमच्यासाठी मी लिहिलेली ही पोस्ट वाचा” अशी पोस्ट तिने शेअर केली. क्रांतीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.