चित्रपट, मालिका व वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन् करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यादेखील एक अभिनेत्री आहेत. सीमा यांनी सिद्धार्थ व त्याच्या बहिणीला एकटीने लहानाचे मोठे केले. सिद्धार्थचे त्याच्या आई व बहिणीशी अनोखे नाते आहे. याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. अशातच अभिनेत्याने नुकतीच ‘व्हायफल’ या पॉडकास्टला भेट दिली.
यावेळी सिद्धार्थला त्याच्या आई व बहिणीबरोबरच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आई व बहिणीबद्दल त्याने भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात माझ्या आईचे लग्न झाले. तिच्या या लग्नानंतर साहजिकच तिच्या आयुष्यात खूप सारे बदल झाले आहेत. ती खूप शांत झाली आहे. एकदा मी घरी आलो. तेव्हा मिताली आईबरोबर जवळपास तासभर बोलत होती. तेव्हा मला मला वाटलं काही झालं आहे की काय. तासभर बोलण्याइतकं काय झालं आहे नक्की. त्यावर मिताली म्हणाली काही नाही. आम्ही आमच्या गप्पा मारत आहोत. त्यामुळे मला वाटतं आईला लग्नानंतर तिचं तिचं स्वत:मध्ये काहीतरी मिळालं आहे. आई व तिचा साथीदार त्यांचं आयुष्य जगत आहेत आणि हेच मला हवं होतं”.
यापुढे ताईबद्दल बोलताना सिद्धार्थ असं म्हणाला की, “मी आत्ताच मामा झालो आहे. त्यामुळे मी सध्या मामापणाचा आनंद घेत आहे. मधला काळ हा तिच्यासाठी पण फार अवघड होता. दोघंही (ताई व ताईचा नवरा) त्यांच्या कामात व्यस्त होते आणि अखेर त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या माझ्या आयुष्यातल्या या दोन महत्त्वाच्या स्त्रिया खूपच आनंदी आहेत आणि त्या सध्या त्यांचं आनंदी आयुष्य जगत आहेत. तसेच त्या त्यांच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत. त्यांना इतर कुणाचीही गरज नाही”.
दरम्यान, सिद्धार्थचा नुकताच सई ताम्हणकरबरोबर श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुकही होत आहे.