Rituraj Singh Death : हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर आली. हिंदी मालिकांचा लोकप्रिय चेहरा ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन् झाले. ४ दिवसांपूर्वी ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन् झाले होते. तिच्यानंतर ऋतुराज सिंह यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऋतुराज यांच्या निधनावर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींकडून शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री स्नेहा वाघ, अर्शद वारसी, दीपिका सिंह, व संदीप सिकंदने दु:खद पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘ज्योती’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघने असं म्हटलं आहे की, “ऋतुराज यांच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. मी खूप लहान होते आणि मला आठवते की तो आम्हाला लहानपणी शिकवत होता. या शोमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आम्ही सेटवर असताना त्याच्या दिलखुलास वागण्याने संपूर्ण वातावरण बदलून जायचे. त्याने सर्वांना आनंदात ठेवले. अशा बातम्यांनी जाग येणे हे खूपच दु:खद आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या ‘ज्योती’ मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाली होती आणि अशातच ऋतुराज यांच्या निधनाची बातमी मन हेलावून टाकणारी आहे”.
I am so saddened to know that Ritu Raj passed away. We lived in the same building, he was a part of my first film as a producer. Lost a friend and a great actor… will miss you brother…
— Arshad Warsi (@ArshadWarsi) February 20, 2024
तर अर्शद वारसीने ऋतुराज यांच्या निधनावर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “ऋतुराज यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. आम्ही एकाच इमारतीत राहत होतो. निर्माता म्हणून तो माझ्या पहिल्या चित्रपटाचा भाग होता. एक चांगला मित्र आणि अभिनेता गमावला. प्रिय ऋतुराज तुम्ही कायम स्मरणात राहाल. पिंकविलाच्या बातमीनुसार, अभिनेत्री दीपिका सिंह म्हणाली- “मी त्यांना फारसे ओळखत नव्हते, पण मी त्यांना एकदा भेटले होते आणि या पहिल्याच भेटीत ते माणूस म्हणून खरे वाटले. मला त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती. पण आता ते कधीच होणार नाही”.
निर्माता संदीप सिकंदनेही ऋतुराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना असं म्हटलं की, “ही बातमी ऐकून खूपच दुःख झाले. आज सकाळी कोणीतरी व्हॉट्सॲप ग्रुपवर हे पोस्ट केले आणि ते बघून मला धक्काच बसला. ‘कहानी घर घर की’मध्ये मी त्यांच्याबरोबर काम केले होते. दरम्यान, ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात सुधारणा होऊन ते घरी परतल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.