Badlapur School KG Girl Sexual Abuse : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला. या घटनेचे पडसाद आता सर्व क्षेत्रातून उमटत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले. रेलरोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांमध्ये व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती हाता बाहेर गेल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज, अश्रूधुराचा वापर करावा लागला. बदलापूरमध्ये घडलेल्या ‘या’ प्रकरणावर मराठी कलाकारदेखील भडकले आहे. मराठी कलाकारांनी यासंबंधित सोशल मीडियावर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. (Badlapur School Sexual Abuse Case)
सिद्धार्थ चांदेकरने याबद्दलची पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आता बोला की, मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे, म्हणजे कुणीही तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. त्या लहान मुलींना संस्कृती शब्दाचा अर्थही माहीत नसेल. शाळेच्या कपड्यातल्या ३-४ वर्षांच्या मुली आहेत त्या, ही विकृती आहे. या विकृत पुरुषांना मानवाधिकार नसावेत. कसलाही अधिकार नसावा, अगदी जगण्याचाही” तर कुशलने याबद्दल असं म्हटलं आहे की, “कुठल्याशा देशात म्हणे असल्या गुन्हेगाराला भर चौकात उभं करुन लिंग कापतात आणि एका देशात तर दगडाने ठेचुन मारतात. या यादीत माझा देश आला तर मला खूप आनंद होईल”.
तसंच सुरेखा कुडची यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरेखा यांनी असं म्हटलं आहे की, “बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले तेही त्यांच्या शाळेकया आवारात… मुलींचं वय साडे तीन वर्ष. आरोपीला पकडलं जातं पण अजूनही शिक्षा का होत नाही. ‘लडकी बचाओ, लडकी पढाओ’ म्हणणारे आता कुठे गेले? की स्वत:च्या घरात जोपर्यंत अशा घटना घडत नाहीत तोपर्यंत डोळे उघडणार नाहीत. शिक्षा एकच फाशी…”
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “विकून खाशील, तुझ्या देशाने रिजेक्ट केलं म्हणून…”, इरिनावर निक्कीचे आरोप, दमदाटी सुरुच
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम स्टोरीवर बदलापूर प्रकरणासंदर्भात असं म्हटलं आहे की, “बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जातपात, धर्म नसतो… फक्त वृत्ती असते आणि तिच ठेचली पाहिजे. ज्यासाठी जाच बसणं गरजेचं आहे. नुसते कायदे कडक असून चालत नाही, ते आपल्याकडे आहेतच… अंमलात कधी आणायचे?आणि सगळ्यांना एक मनापासून विनंती, कृपया बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं कुठल्याही पद्धतीने राजकारण करू नये”.
दरम्यान, बदलापूरमधील प्रकरणावर अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला आहे. मृण्मयी देशपांडे, अक्षय केळकर, प्रसाद ओक, शिवाली परब, प्रिया बापट, अभिजीत केळकर, नेहा शितोळे, सुरभी भावे, रितेश देशमुख यांसारख्या अनेकांनी संतापजनक पोस्ट शेअर केल्या आहेत. बदलापूरच्या शाळेत घडलेली घटना अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे असं मत अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.