Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ या पहिल्याच टास्कमध्ये दोन्ही ग्रुपच्या सदस्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात. यावेळी जान्हवी आपल्या मर्यादा ओलांडत पंढरीनाथ म्हणजे पॅडी यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरबद्दल अपमानास्पद वक्तव्य करते. यावेळी जान्हवी म्हणते की, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात तोंडासमोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत” (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
जान्हवीच्या या वक्तव्यानंतर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी जान्हवीच्या या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. अभिजीत केळकर, विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची यांनी व अनेक चाहत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर जान्हवीचा नवरा किरण किल्लेकरने पोस्ट शेअर करत यावर भाष्य केलं आहे. “लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करु नये” अशा आशयाची पोस्ट शेअर केली असून यात “२४ तासांच्या प्रवासात काय काय घडतं? हे माहिती नसतं” असं म्हटलं आहे.

किरण किल्लेकर यांनी पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअरवर बोलणं योग्य नाही. पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे. ती नक्कीच चुकली आहे. ‘बिग बॉस’चे घर साधं घर नाही. तिथे आलेले लोक पॉझिटीव्ह असतील असंही नाही किंवा प्रत्येकजण निगेटिव्ह आहेत असंही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात आणि त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या खासगी आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करु नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची आणि बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय वर्षा ताईंबद्दल बोलतो की, मी या बाईंचा एक दिवस पाणउतारा नक्की करणार. अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत. अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू. तेव्हा कुठे गेले आदर्श? तेव्हा वर्षा ताई सिनियर नव्हत्या का?
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुला आताच मारेन”, वैभवची आर्याला धमकी, अंगावर ओरडत राहिला अन्…; हे वागणं शोभतं का?
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “जेव्हा जान्हवी बोलली तेव्हा तिचे आदर्श, चुकीचे शब्द लोकांना दिसले. पण तिने नंतर वर्षा ताईंची माफी मागितली. त्यांची सेवा केली ते फक्त फुटेजसाठी जान्हवीने केलं असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा २४ तासांच्या प्रवासात काय काय घडतं?. आपल्याला याची काही माहिती नसते. फक्त एक तास आपल्याला जी माहिती पुरवली जाते त्यात कोण वाईट आणि कोण चांगलं हे लोकांनी ठरवू नका. खेळ सुरु असताना कोण काय करतं? आणि कसं उत्तर देतं?, का देतं? याचा पण विचार करा. बस्स… बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगी सारखं पसरवतील. काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन की, तू रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा. आम्ही नेहमीच तुझ्या बरोबर आहोत.