‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेला आजवर खूप पसंती मिळाली आहे. या मालिकेने दीर्घ काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अक्षरा-नैतिक ही जोडी तर आजही सगळ्यांच्या मनात घर करुन आहेत. अक्षराची भूमिका साकारलेल्या हिना खानच्या तब्येतीबद्दलच्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत. हिनाला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. सध्या त्यावर तिचे उपचार सुरु असून तिचे अनेक व्हिडीओ व फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता या मालिकेमध्ये कार्तिक ही भूमिका साकारणाऱ्या ३२ वर्षीय मोहसीन खानबद्दल एक अपडेट समोर आली आहे. (mohsin khan heartattack)
मोहसीनने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याचे त्याने सांगितले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ऐकून मोहसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र मोहसीनने आता एकदम फिट असल्याचेदेखील सांगितले आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मोहसीन म्हणाला की, “माझे फॅटी लिव्हर झाले होते त्यामुळे गेल्या वर्षी सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. पण मी याबद्दल कोणालाही काहीही सांगितले नाही. मी काही दिवसांसाठी रुग्णालयातदेखील भरती झालो होतो. त्यानंतर माझ्यावर उपचार झाले, दोन-तीन रुग्णालयेदेखील बदलली. उपचार घेतल्यानंतर मी बरा झालो. आता सगळं आटोक्यात आहे”.
आणखी वाचा – श्रद्धा कपूरचा नवा रेकॉर्ड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, नक्की काय घडलं?
पुढे त्याने सांगितले की, “तब्येत बिघडल्यामुळे माझ्या रोगप्रतिकारक शक्तीवर खूप परिणाम झाला होता. त्यामुळे मी सारखा आजारी असायचो”. तसेच फॅटी लिव्हरचे कारण विचारले असता त्याने सांगितलं की, “याला नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर म्हणतात. मद्यपान न करता हे होऊ शकते. झोपण्याचे वेळापत्रकदेखील व्यवस्थित नसेल तरीही ही समस्या येऊ शकते”. दरम्यान ‘ये रिश्ता…’ या मालिकेबरोबरच ‘लव्ह बाय चान्स’, ‘मेरी आशिकी तुमसे ही’, ‘निशा और उसके कजन्स’, ‘ड्रीम गर्ल’ व ‘प्यार तुने क्या किया’ या मालिकेमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत. आता तो अभिनयक्षेत्रापासून दूर असलेला पाहायला मिळत आहे.