प्रत्येकच आईला वाटतं की, आपल्या मुलाने मोठं होऊन समाजासाठी काहीतरी करावं. त्यासाठी ती आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असते. ती जितकी आपल्या मुलासाठी कठोर राहण्याचा प्रयत्न करते, तितकीच ती त्याच्यावर भरपूर जीव लावते. आणि या माय-लेकाचा नात्याचा खरा अर्थ सर्वांसमोर आणला, तो ‘श्यामची आई’ या कादंबरीने. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या या अजरामर कादंबरीबर आजवर अनेक कलाकृती आल्या आहेत. मात्र, आता माय-लेकाच्या या प्रेमळ नात्याची गोष्ट मोठ्या पडद्यावर येणार आहे. (Shyamchi Aai movie Trailer)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके ‘श्यामची आई’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर व टीझर प्रदर्शित करण्यात आलं. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर अखेर समोर आला आहे. २ मिनिटांच्या चित्रपटाचा हा संपूर्ण ट्रेलर ‘ब्लॅक अँड व्हाइट’ स्वरूपात असणार आहे. या ट्रेलरची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळातील दृश्याने झाली आहे. त्यानंतर कडक शिस्तीची पण मायाळू आई व तिच्या श्यामची ही सुंदर गोष्ट ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
हे देखील वाचा – सकाळी ११ ते रात्री ३ वाजेपर्यंत शूट, पाच-सहा तासांचा प्रवास अन्…; ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडेचा खुलासा, म्हणाली, “दुर्गेचा अवतार…”
अभिनेता ओम भुतकर यामध्ये साने गुरुजींची भूमिका साकारणार आहे. गौरी देशपांडे श्यामच्या आईची, तर बाल कलाकार शर्व गाडगीळ छोट्या श्यामच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, मयूर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटातील संवाद, कलाकारांचा अभिनय व लूक्स सर्वांचे लक्ष वेधत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रसिक प्रेक्षकांना आवडला आहे. चाहत्यांना या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता लंगगली आहे.
हे देखील वाचा – Bigg boss 17 : एकमेकांची कॉलर पकडली, अंगावर धावून गेले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पहिल्याच दिवशी हाणामारी, अंकिता व विकीमध्येही बिनसलं
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी चित्रपटाची संहिता लिहिली आहे. तर चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे. ‘पावनखिंड’ या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब-अजय-अनिरुद्ध आरेकर, आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.