मराठीतील मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे रवि जाधव. त्यांनी मराठीतच नाही तर हिंदी क्षेत्रातही आपली छाप सोडली आहे. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत त्यांनी ‘ताली’सारखी सुंदर कलाकृती बनवली. त्यांनी आपल्या कामातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण एवढं यश व प्रसिद्धी मिळवली असली तरीही त्यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. हा संघर्ष त्यांच्या कुटुंबियांशिवाय कोणी जवळून पाहिला असेल. नुकतंच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मैत्री स्पेशल भागाता रवि जाधव आले होते. त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या जीवाभावाचा मित्र म्हणजेच त्यांच्या थोरला भाऊ. त्यांच्या खडतर प्रवासाबाबत आणि त्यांच्या बालपणींच्या आठवणींना त्यांनी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या एका व्हिडिओतून उजाळा दिला. (ravi jadhav struggle stories)
रवि जाधवांबद्दल त्यांचे मोठे भाऊ राजेंद्र जाधव सांगतात, “लोक मला रवि जाधवचा भाऊ म्हणून ओळखतात तेव्हा मला खूप आनंद होतो. आमचं नातं अगदी घट्ट मैत्रीसारखंच आहे. त्यामुळे आम्ही आजपर्यंत सगळी भावंड एकत्र आहोत. याचा मला खूप अभिमान आहे. रवि लाकडा भाऊ आहे. रविसाठी मी लहानपणापासून बाबांचा खूप ओरडा खाल्ला. आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा त्याला लवकर खेळायचं असायचं आणि लवकर आऊट झाला की तो आपली बॅट घेऊन पळून जायचा”.
ते पुढे सांगतात, “बाबा मीलमध्ये कामाला होते. तेव्हा आमची परिस्थिती खूप हालाखीची होती. आमचं सहा जणांचं एकत्र कुटुंब होतं. पैशाची खूप अडचण असायची. त्यामुळे तो पेपर टाकायचं काम करायचा, चित्रही काढायचा. डेकोरेशनची काही कामं करायचा असं करता करता कधी शिक्षण पूर्ण केलं व कधी नोकरीला लागला आम्हाला काही कळलंच नाही”.
रवि यांच्या लव्हस्टोरीबद्दल ते पुढे सांगतात, “रविची लवस्टोरी दगडू सारखीच होती. त्याला कोणी मदत नाही केली. चित्रकलेचं त्याच्याकडे खूप छान कौशल्य होतं. त्यामुळे त्याच्या आयुष्याला खूप गती मिळाली. तो कॉलेजातून घरीच यायचा नाही. १२च्या नंतर ट्रेनच नसायच्या. रात्री प्लॅटफॉर्मवरच झोपायचा. सारं काम पुर्ण करुनच तो दोन-दोन दिवसांनी घरी यायचा. या जिद्दीमुळेच तो पुढे यशस्वी झाला”, असं सांगत त्यांनी रवि जाधव यांच्या लहानपणींच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या खडतर प्रवासाबाबत सांगितलं.