Lagnantar Hoyilch Prem Promo : स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील प्रत्येक नवीन ट्विस्टसोबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसत आहे. अशातच वाहिनीने मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला असून, यामध्ये काव्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटाची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या संकटाच्या वेळी नंदिनीने घेतलेली जबाबदारी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
नव्या प्रोमोमध्ये काव्या कॉलेजमध्ये असल्याचं दिसतं. मात्र, अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू होतात. काव्याची डिलिव्हरीची वेळ जवळ आल्यामुळे तिला प्रसूतीच्या कळा येत असल्याचं दिसतं. तिची अवस्था पाहून नंदिनी आणि पार्थदेखील चिंतेत पडतात. काव्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून पार्थ डॉक्टरांना फोन करतो. मात्र, परिस्थिती त्यावेळी आणखी गंभीर होते. काव्याला रुग्णालयात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचं समोर येतं. त्यामुळे कॉलेजमध्येच काव्याला मदत करण्याची वेळ येते. दरम्यान, काही विद्यार्थी काव्याचा व्हिडीओ शूट करताना दिसतात. हा प्रकार पाहून पार्थचा पारा चढतो. तो विद्यार्थ्यांना रोखत दरवाजा बंद करताना दिसतो. यानंतर प्रोमोमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. नंदिनीच काव्याची डिलिव्हरी करताना दिसते.
आणखी वाचा – पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त
या प्रोमोला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं असून, विशेषतः ज्ञानदाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तर काहींनी मालिकेच्या कथानकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “नंदिनीला सगळं कसं येतं? ऑलराऊंडर नंदिनी!” अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली आहे. तर “सिरीयल थर्ड क्लास बनत चालली आहे,” अशी नाराजीही काहींनी व्यक्त केली आहे. आता काव्याची डिलिव्हरी सुखरूप होणार का?, बाळाची प्रकृती कशी असेल आणि या घटनेनंतर नंदिनी-काव्याच्या नात्यात काय बदल होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचा आगामी ट्रॅक नेमकं कोणतं वळण घेतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा – ‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी
