अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत अचानक समोर आलेल्या बातमीने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळालं. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. चित्रीकरण संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. शूटिंगनंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेच अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Mangesh Desai On Shreyas Talpade)
रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आल्यामुळे श्रेयसवरील मोठा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री १० वाजताच्या सुमारास श्रेयसची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. याबाबतची माहिती श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदे हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. श्रेयसच्या पत्नीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत “माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेली काळजी, प्रेम व प्रार्थनेसाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. मला हे सांगताना अतिशय समाधान वाटतं आहे की, श्रेयसची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज मिळणार आहे” असं म्हणत चाहत्यांचे आभार मानले.
आणखी वाचा – ‘CID’ फेम अभिनेत्रीला कुटुंबियांकडून मारपीट, जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली अन्…
श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते व सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीही प्रार्थना करताना दिसत आहेत. अशातच अभिनेते, निर्माते मंगेश देसाई याने देखील श्रेयस बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत त्यांनी श्रेयसबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. यांत मंगेशसह त्यांचे कुटुंब व श्रेयसही आहे. हा फोटो पोस्ट करत, “श्रेयस देसाई कुटुंब व संपूर्ण मराठी नाट्य चित्रसृष्टीच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत .लवकर बरा हो. तुला उत्तम सिनेमे करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे” असं कॅप्शन दिलं आहे.
याआधीही मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी श्रेयसच्या तब्येतीबाबत प्रार्थना केली. अभिनेत्री रेशम टिपणीसने “काळजी घे. श्रेयसला लवकरच बरं वाटेल. गणपती बाप्पा त्याची काळजी घेत आहे” असं म्हटलं. तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही “श्री स्वामी समर्थ” अशी कमेंट केली आहे. तसेच श्रेयसच्या अनेक चाहत्यांनीही कमेंटद्वारे त्याच्या तब्येतीबाबत प्रार्थना व्यक्त केली आहे.