ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते बीरबल उर्फ सतींदर कुमार खोसला यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ८४ वर्षांचे होते. दरम्यान, खोसला यांच्या पार्थिवावर बुधवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे उपचार सुरू होते. (Veteran Actor Birbal passed away)
मूळचे पंजाबचे असलेले सत्येंद्र कुमार खोसला उर्फ बिरबल यांचा जन्म १९३८ सालचा. ते मुख्यतः विनोदी भूमिकांसाठी ओळखले जायचे. १९६७ मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित व जितेंद्र आणि मुमताज यांच्या भूमिका असलेल्या ‘बूंद जो बन गई मोती’ चित्रपटातून बिरबल यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. बिरबल यांनी तब्बल ५००हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. ज्यात हिंदी चित्रपटांबरोबरच पंजाबी, भोजपुरी, मराठी अशा विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – Video : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित, अवघ्या काही तासातच ट्रेलरला मिळाले इतके व्ह्यूज
‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘क्रांती’सह मनोज कुमारच्या अनेक चित्रपटांमध्ये बिरबल यांनी काम केले आहे. ‘शोले’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी अर्धवट मिशा असलेल्या कैद्याची भूमिका केली होती, जी प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. तसेच ‘आराधना’, ‘मेरा नाम जोकर’, ‘जुगारी’, ‘बोल राधा बोल’, ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटांमध्येदेखील ते दिसले आहेत.
हे देखील वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बिरबल यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा परदेशात असून मुलाच्या येण्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ते गेल्या काही काळापासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत होते. मुंबईतल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. असे असताना देखील वर्षभरापूर्वीपर्यंत ते चित्रपटांमध्ये काम करत होते. २०२२ मध्ये आलेल्या ‘१० नही ४०’ मध्ये ते शेवटचे दिसले होते.