सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेकजण गणेशाकडे मागणं मागताना दिसत आहेत. अशातच झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेने बाप्पाकडे एक मागणं मागितलं असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाप्पाचा फोन येताच बाप्पाजवळ मन मोकळं करताना शिवानी दिसत आहे. यावेळी शिवानीने मराठमोळ्या बाप्पाला सध्या समाजात घडणाऱ्या गोष्टींची दखल घेण्याची विनंती केली आहे. मास्तरीणबाईंनी बाप्पाकडे केलेली ही विनवणी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर शाळेत झालेला अत्याचार, कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन केलेली तिची हत्या हे प्रकरण सध्या अजून शांत झालेलं नाही. यांसारखे प्रकरण पुन्हा होऊ नये यासाठी मास्तरीन बाईंनी गणरायाकडे विनंती केली आहे. (Shivani Rangole Viral Video)
गणपती बाप्पांना फोनवर सांगत शिवानी असं म्हणताना दिसत आहे की, “हॅलो बाप्पा, कसा आहेस तू? एरवी तू आम्हाला विचारतोस, कशी आहेस, कसा आहेस पण आज मी तुला विचारते, तू कसा आहेस?. तुझ्या उत्सवाची आम्ही जोरदार तयारी करत आहोत आणि तुझ्या आगमनाची आतुरतेनं वाट बघत आहे. यावेळी खूप लोक खूप काही तुझ्याकडे मागत असतील. मलाही तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. पण मी माझ्यासाठी काही मागणार नाही. कुठलीही वस्तू मागणार नाही आहे. मला तुझ्याबरोबर काहीतरी शेअर करायचं आहे”.
पुढे तिने असं म्हटलं आहे की, “गेले काही दिवस वर्तमानपत्र उघडलं, सोशल मीडिया उघडलं की, खूप बातम्या दिसतात. ज्यामध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल, मुली म्हणजे अगदी चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल, शाळेत घडणाऱ्या अत्यंत वाईट घटनांबद्दल कळतं. वर्तमानपत्र अगदी अशा बातम्यांनी भरुन गेलेलं असतं की, ते बघून प्रचंड त्रास होतो. असं वाटतं की, शाळेसारखी जागा सुरक्षित नसेल, तर मुलींना कुठे सुरक्षित वाटणार? आणि म्हणून मला तुझ्याकडे असं मागायचं आहे की, मुलांआधी पालकांना शिक्षण दे. आपल्या मुलांना कसं वाढवायचं याचं शिक्षण दे, बुद्धी दे. मुलींनी कसं वागावं, कसं बोलावं, कसे कपडे घालावेत यापेक्षा मुलांची नजर कशी असावी, आपण आपल्या मुलाला कसे वाढवत आहोत.
शिवानी विनंती करत असे म्हणाली की, “मुलींनी घरात सातच्या आत यायला पाहिजे यापेक्षा सातनंतर आपला मुलगा काय करतो, तो कुठे असतो, त्याची संगत काय आहे, या गोष्टींचा पालकांनी विचार करावा, अशी बुद्धी त्यांना दे. मुलींना, बहिणींना, आत्यांना, मामींना, आजीला, आईला सुरक्षित वाटेल अशा वातावरणाची निर्मिती होऊ दे. मला खात्री आहे की, तुझ्या येण्यानं हे जे मळभ आलेलं आहे ते सगळं दूर होईल आणि प्रकाशच प्रकाश सगळीकडे असेल. आणि माझी मागणी तेवढी पूर्ण कर”.