झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ तशी कशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत पोहचला. या मालिकेतून शाल्वला बरीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर तो झी मराठीवरीलच ‘शिवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरबरोबर शाल्वने नुकतीच लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसांपासून शाल्वच्या लग्नाची चर्चा सुरु होती. या लग्नसमारंभाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन समोर आले. शाल्व आणि श्रेया एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. त्याचप्रमाणे त्यांचा साखरपुडाही झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी लग्नगाठ बांधली. (Shalva Kinjwadekar Marriage Unseen Video)
अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर आणखी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या लग्नाची संपूर्ण झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला शाल्वची पत्नी म्हणजेच श्रेया लग्नाच्या लूकमध्ये सजलेली पाहायला मिळत आहे आणि तिला या खास लूकमध्ये बघून कुणीतरी “अरे सकाळ सकाळ एवढं क्युट कोण दिसत आहे” असं म्हणत आहे. त्यानंतर ती शाल्वला शोधते आणि तेव्हा ती “कुठे आहे शाल्व?” असं म्हणते. पुढे या व्हिडीओमध्ये शाल्व कॉफी बनवतानाही दिसत आहे. यानंतर शाल्व आणि श्रेया लग्नमंडपाकडे जातानाचेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
शाल्व-श्रेया यांच्या लग्नात अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने श्रेयाला लग्नमंडपात आणले होते. तर त्याची बायको मिताली मयेकर हिने श्रेयाच्या डोक्याला मुंडावल्या बांधल्या. तसंच लग्न लागताच श्रेया भावुक झाल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. गायिका प्रियंका बर्वेने मंगलाष्टकादेखील गायल्या. लग्नासाठी शाल्व-श्रेया यांनी दोन लूक केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
लग्नाच्या आधीच्या विधींसाठी शाल्वने पेशवाई पद्धतीचा ऑफ व्हाईट कुर्ता व त्यावर धोतर नेसलं आहे, तर श्रेयाने हिरव्या रंगाची सहावारी साडी आणि त्यावर गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे. तर लग्नात या दोघांनी लाल रंगाच्या लूकला पसंती दिली होती. सोशल मीडियावर शाल्व-श्रेया यांच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.