Shiva Fame Actor Shalva Kinjawadekar Pre Wedding Rituals : मराठी विश्वातील अनेक कलाकार एकामागोमाग लग्नबंधनात अडकत आहेत. सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच रेश्मा शिंदे, अभिषेक गांवकर ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली आहेत. तर किरण गायकवाड, वैष्णवी कल्याणकर, शिवानी सोनार, अंबर गणपुळे ही कलाकार मंडळी काही दिवसांतच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. आता मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता शाल्व किंजवडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या घरी लगीनघाई सुरु झाली असल्याचं समोर आलं असून अभिनेता चार दिवसांनी विवाहबंधनात अडकणार आहे.
अभिनेता शाल्व किंजवडेकर व फॅशन डिझाइनर श्रेया डफळापुरकरशी लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. २०२३ मध्ये शाल्व व श्रेया यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. तर श्रेया व शाल्व यांच्या केळवणाचे फोटोही समोर आले. त्यांच्या या केळवणाच्या फोटोंनी लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं. अखेर आता ही जोडी चार दिवसांनी लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे.
शाल्वच्या होणाऱ्या बायकोने पोस्ट शेअर करत लगीनघाई सुरु झाली असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. थेट ग्रहमखचे फोटो शेअर करत तिने चार दिवसांत लग्न असल्याचा खुलासा केला आहे. यामुळे शाल्वच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रहमखसाठी श्रेयाने पारंपरिक लूक केला आहे. तिच्या या सिंपल लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. नारिंगी रंगाची साडी, मुंडावळ्या, गळ्यात मोत्याचा छानसा नेकलेस या साध्या लूकमध्ये नवरी मुलगी खूपच सुंदर दिसत आहे.
श्रेयाच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर ग्रहमख सोहळ्यादरम्यानचा फोटो शेअर करत “४ दिवस बाकी”, असं कॅप्शन दिलं आहे. यावरुन आता शाल्व-श्रेयाच्या लग्नाला मोजकेच काही दिवस उरल्याचं स्पष्ट झालं आहे. शाल्वची होणारी पत्नी श्रेया ही कॉस्ट्युम डिझायनर व स्टायलिश असून ‘Styling By Shreya’ असं तिच्या ब्रँडचं नाव आहे.