मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात ‘आपला माणूस’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा कलाकार म्हणजे शिव ठाकरे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे व निरागस हास्याने शिवने अनेकांची मनं जिंकली आहेत. आपल्या डान्स व दिलखुलास स्वभावामुळे चर्चेत राहणारा शिव सोशल मीडियाद्वारेदेखील कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच सोशल मीडियावर सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सध्या रमजाननिमित्त ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असून नुकतीच शिवनेदेखील एका इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी मुस्लिम बांधवांकडून अभिनेत्याचा सन्मान करण्यात आला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याने केलेल्या कृतीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शिवने रमजाननिमित्त गरिबांना अन्नदान केले आणि त्याच्या याच समाजभान जपणाऱ्या कृतीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रमजान पर्वात बहुसंख्य मुस्लीम बांधव उपवास (रोजे) करतात. त्यामुळे रमजानच्या पर्वात अनेक कुटुंबीय प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या गरिबांना मदत करतात. सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळेस अन्नदान म्हणून विविध पदार्थांचे वाटप करणे हे पवित्र मानले जाते. त्यामुळे अनेक मुस्लिम बांधव अन्नदान म्हणून पदार्थांचे वाटप करत असतात. शिवनेदेखील रमजानच्या पर्वात गरिबांना अन्नदान केल्याने तो सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.
‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजने शिवचा हा अन्नदान करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओखाली शिवच्या अनेक चाहत्यांनी त्याचे या कृतीबद्दल कौतुक केले आहे. “खूप छान काम, शिव कायमच समाजकार्यासाठी योगदान देतो, समाजभान जपणारा माझा आवडता अभिनेता, याच कृतीमुळे शिव हा इतर कलाकारांपेक्षा वेगळा आहे, कायम असेच समाजकार्य करत रहा” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली आहे.