झी मराठी वहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. मालिकेची कथा व कथेत रोज नव्याने येणारे ट्विस्ट या मालिकेची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत. या मालिकेतील नायिका असो किंवा खलनायिका प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपआपले पात्र उत्तमरित्या निभावलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ती पात्र आपलीशी वाटतं आहेत.
अशातच या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला. यानिमित्ताने नुकतेच मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. मालिकेने आता ५०० भागांचा टप्पा गाठला असून हा खास क्षण जोरदार साजरा करण्यात आला. यावेळी मालिकेतील कलाकार मंडळींसह संपूर्ण टीम उपस्थितीत होती. याचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. याचनिमित्ताने मालिकेतील इंद्राणी म्हणजेच अभिनेत्री श्वेता मेहेंदळेने ‘इट्स मज्जा’बरोबर खास ससंवाद साधला.
‘इट्स मज्जा’बरोबरच्या या खास संवादात श्वेताने तिच्या मुलाकडून तिच्या अभिनयाच्या कौतुकाविषयी सांगितले आहे. यावेळी ती असं म्हणाली की, “मालिका रात्री प्रदर्शित होत असल्यामुळे तो फार कमी वेळा ही मालिका बघतो. पण कधी कधी तो मालिकेचे काही भाग बघतो किंवा एक-दोनदा तो माझ्याबरोबर सेटवरही आला आहे. तेव्हा त्याने “आई तुझ्याकडे खरंच शक्ती आहे का? तुला खरंच मनातलं ओळखता येतं का?” असं विचारलं होतं.
यापुढे तिने असं म्हटलं की, “आम्ही कधी त्याच्या शाळेत गेलो तर शाळेतील मुलं, शिक्षक किंवा बाकीची मंडळी आमच्याशी येऊन बोलतात. आमचे कौतुक करतात आणि त्याला याचं खूपच कौतुक आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं की, आपले आई-वडील एक असं काम करतात. ज्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. त्यामुळे हे सगळं बघून त्याला खुपच भारी वाटतं.”
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा, अजिंक्य व्यतिरिक्त ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, मुग्धा गोडबोले-रानडे, रजनी वेलणकर, जान्हवी किल्लेकर, अमृता रावराणे, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.