प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाचं, मुलीचं कौतुक हे असतंच. आपल्या पाल्याने खूप मोठं व्हावं आणि त्याचा नावलौकिक व्हावा अशी सर्वच आई-वडिलांना इच्छा असते आणि याची जाण ठेवत प्रत्येक पाल्य आई-वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करत असतो. त्यातही आपला मुलगा-मुलगी टीव्हीवर दिसणे याचे प्रत्येक आई-वडिलांना कौतुक असते. असेच कौतुक अभिनेत्री तितीक्षा तावडेच्या आई-वडिलांनादेखील असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नेत्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केले आहे. अशातच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे नुकताच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा ओलांडला. यानिमित्त मालिकेतील नेत्रा-अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरे व तितीक्षा तावडेने ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी तितीक्षाने तिच्या आई-वडिलांना प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितले आहे.
यावेळी तितीक्षा असं म्हणाली की, “माझी आई मालिकेचा एकही भाग चुकवत नाही. ती ही मालिका रोज नित्यनेमाने बघते आणि माझी आई फक्त कौतुक करते. ती इतकी प्रेमळ आहे की, ती कौतुकाशिवाय काहीच करत नाही. तिला कधीही हे चांगलं नाही किंवा वाईट बोलणं हे जमतंच नाही. त्यामुळे ती फक्त माझ्या बाळाने काय सीन केला आहे. तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं, खूप छान काम केलंस असं म्हणत कायम कौतुकच करते.”
यापुढे ती म्हणाली की, “आमच्या डोंबिवलीमधील गिफ्टच्या दुकानात माझे व ताईचे पोस्टर लावले आहेत. तर ते पोस्टर बघून लोक आई-वडिलांना तुम्ही असं प्रमोशन का करता? तुम्हाला याचे पैसे मिळतात का? असं विचारतात. तर माझे आई-बाबा त्यांना या आमच्या मुली आहेत असं सांगतात. पण लोकांना विश्वासच बसत नाही आणि ही गोष्ट माझी आई मला ज्या कौतुकाने व उत्साहाने सांगते ते बघून मला खूपच भरून येतं आणि मग आपण करत असलेल्या मेहनतीबद्दल छान वाटतं.”