Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मोहम्मद शरीफुल इस्लाम आझाद या अज्ञाताला अटक केली आहे. एवढेच नाही तर सैफच्या घरातून शरीफुलचे १९ बोटांचे ठसेही घेण्यात आले असून ते चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र शहजादचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचा चेहरा आणि सैफच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या हल्लेखोराशी अजिबात जुळत नाही. वापरकर्त्यांनी शेहजादच्या चित्राची तुलना सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या हल्लेखोराच्या छायाचित्राशी करत प्रश्न उपस्थित केला आहे.
नेटकऱ्याने असे म्हटलं आहे की, दोन्ही लोक पूर्णपणे भिन्न आहेत. पुरावा म्हणून, वापरकर्त्यांनी X वर अटक केलेल्या शहजादचा आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा हल्लेखोराचा फोटो शेअर केला. एका युजरने फोटो शेअर करत लिहिले की, “एक लहान मूलही म्हणू शकते की दोघेही भिन्न आहेत आणि एकच व्यक्ती नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे प्रकरण इतक्या झपाट्याने वाढले की तो सीमेचा मुद्दा बनला आणि पोलिस त्यामागे लपून बसण्यात धन्यता मानतात. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला आणि अटक करण्यात आलेला दुसरा व्यक्ती यांच्यात काहीही साम्य नाही”.
आणखी एका युजरने अटक केलेल्या शहजाद आणि सीसीटीव्ही हल्लेखोराच्या फोटोंचा कोलाज शेअर करत लिहिले की, “काल आकाश कनोजिया होता आणि आता तो शरीफुल आहे. मुंबई पोलीस संभ्रमात आहेत. मीडियामध्ये सर्कस चालू आहे. ती एकच व्यक्ती नाही. अजिबात साम्य नाही”. तर आणखी एका युजरने फोटो शेअर करत लिहिले, “फोटो १ – सैफ अली खानवर हल्ला करणारा घुसखोर. चित्र २- रेल्वे संरक्षण दलाने अटक केलेला संशयित. मला काही साम्य दिसत नाही. तुम्हाला काही साम्य दिसतंय का?”.
दुसरी टिप्पणी अशी की, “हे दोघे खरोखर एकच व्यक्ती आहेत का असा प्रश्न मनात आला. वय, नाक, ओठ, केस, वजन काहीही सारखे दिसत नाही. मात्र सैफवर हल्ला करणाऱ्याला आम्ही अटक केल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. ही एक पळवाट आहे का?”.