‘बिग बॉस १३’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवला. वयाच्या १९व्या वर्षी शेफालीने तिच्या एका म्युझिक व्हिडिओद्वारे बरीच ओळख मिळवली होती. शेफाली २००२ मध्ये आलेल्या ‘काटा लगा’ या म्युझिक व्हिडिओने खूप प्रसिद्ध झाली होती. या गाण्यानंतर ती रातोरात स्टार झाली. तिला अमाप लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली. संगीत व्हिडिओंमधून खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर शेफालीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती दिसली होती.
‘मुझसे शादी करो’ या चित्रपटानंतर शेफालीने अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला. २००८ मध्ये ‘बूगी वूगी’मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. अशातच शेफालीने नुकत्याच एका मुलाखतीत तिला कधीही मुलं होणार नाहीत असं म्हटलं आहे. अलीकडेच पारस छाब्राच्या शोमध्ये शेफाली जरीवालाला विचारण्यात आले की, “तिने बेबी प्लॅन्सबद्दल कधी विचार केला नाही?” यावर अभिनेत्री म्हणाली, “आपल्याला स्वतःचे मूल कधीही होऊ शकते. पण मला वाटते की, जगात अशी अनेक मुले आहेत ज्यांना घराची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. प्रत्येकजण आपल्या मुलांवर प्रेम करतो, परंतु जो दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरात आणतो आणि त्याचे पालनपोषण करतो तो सर्वात महान आहे.
यापुढे ती असं म्हणाली की, “वयाच्या १२-१३व्या वर्षी जेव्हा मला मूल दत्तक घेण्याचा पर्याय समजला तेव्हापासूनच माझ्या मनात मूल दत्तक घेण्याचा विचार आला होता. दत्तक घेणे हा एक असा निर्णय आहे ज्यामध्ये तुमच्या पतीला आणि तुमच्या कुटुंबीयांचाही पूर्ण पाठिंबा असायला हवा. आमच्या घरात सर्व काही तयार आहे. परंतु मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया खूप लांब असते, या काळात मुले मोठी होतात आणि प्रत्येकाला लहान मूल हवे असते. पराग आणि मी खूप दिवसांपासून मूल दत्तक घेण्याचा विचार करत होतो, पण ते शक्य होत नाही. दुसरं म्हणजे माझ्या आणि परागच्या वयात खूप फरक आहे”.
बाळाच्या नियोजनाबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पती आणि माझ्या वयातील फरकामुळे मला आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. सर्व प्रयत्न करुन आम्ही हार मानली. आता असं वाटतं की देवाची इच्छा असेल तेव्हा आमच्या घरी ज्याला यायचं आहे तो येईल. पारस व मला नेहमीच मुलगी हवी होती. त्यामुळे आमच्या नशीबात जे असेल ते मिळेल”.