Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांचा सहभाग आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात नेते, अभिनेते, कीर्तनकार व सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अशा एकूण सोळा स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. घरातील सहभागी स्पर्धकांवर चाहत्यांसह कलाकार मंडळीदेखील व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यात ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांचादेखील सहभाग आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील त्यांना पटणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टींबद्दल ते व्यक्त होताना दिसत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Update)
पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे, किरण माने यांसह इतर मंडळीही ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाबद्दल आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक जय दुधाणेने बिग बॉसच्या शुक्रवारच्या भागाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कालच्या भागात निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडणं झाली आणि या भांडणात निक्कीची जीभ घसरली. या भांडणात तिने वर्षाताईंबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारले. याचबद्दल जयने संताप व्यक्त केला आहे.
जयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “अभिजीत सावंत यांना सलाम. कारण जान्हवी (बुगु बुगु)ने आपल्या महाराष्ट्राची एक सुपरस्टार अभिनेत्री वर्षाताई यांच्याबरोबर काय केले? हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पूर्णपणे घृणास्पद आणि अपमानास्पद आहे हे. माझ्याही सीझनमध्ये मारामारी झाली. पण मला अजूनही आठवतं, आमच्या सीझनमध्ये एकाही स्पर्धकाने वरिष्ठांचा अनादर केलेला नाही”. याचबरोबर त्याने निक्कीचा उल्लेख करत “निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’चा आतापर्यंतचा सर्वात वाईट स्पर्धक आहे” असं म्हटलं आहे.
दरम्यान ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील भांडणं-वाद-विवाद काही नवीन नाहीत. घरातील स्पर्धकांमध्ये काहीना काही कारणावरुन सतत वाद होतच असतात. मात्र यंदाच्या पर्वात निक्की व वर्षाताई यांच्यातील भांडणं खूपच विकोपाला जात असून यात निक्कीकडून वर्षाताईंचा सतत अपमान केला जात आहे. त्यामुळे घराबाहेरील त्यांचे चाहते व इतर कलाकार याबद्दल रोष व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे आता याबद्दल रितेश देशमुख काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.