मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आजूबाजूच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही भाष्य करत असतात, अशा काही कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका मांडत असतो. याआधी त्याने अनेकदा त्याच्या राजकीय व सामाजिक भूमिका सोशल मीडिया किंवा मुलाखतीच्या मध्यायातून व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने नुकतीच ठाणे घोडबंदर रस्त्यावरील ट्रॅफिकबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शशांकने एक व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “मीरारोड आणि ठाण्याच्या मध्ये लोणावळ्याचा फील येण्यासाठी ही योजना आखलेली आहे. खरंतर मला याचा अर्थच कळत नाही. म्हणजे सिग्नल चांगले लावून त्याचा खर्च वाचवण्यापेक्षा, रस्त्यात खड्डे आणि चुकीच्या मार्गावरुन येणाऱ्या गाड्या आणि गैरशिस्तपणा यामुळे सिग्नलचं एक वेगळंच काम आपल्याकडून केलं जात आहे. ही दूरदृष्टी आपल्याच देशात आहे. मला फार बरं वाटत आहे की, सिग्नलचा खर्च, खड्ड्यांमुळे स्पीडब्रेकर्सचा खर्च वाचतो. या सर्वासाठी एक वेगळीच दृष्टी लागते. लोकांचा जीव, वेळ हे काय तसं फारसं महत्त्वाचं नाही. मला पण असं वाटत आहे की, माझी गाडी इथेच उभी करुन मी पण शूटिंगसाठी चालत गेलं पाहिजे. कारण रात्री ९-१० पर्यंत या गाड्या इथून हलणार नाहीत”.
शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो स्वत: रस्त्याच्या मधोमध इतर गाड्यांमध्ये अडकलेला दिसत आहे. त्याच्या मागे व पुढे अशा अनेक गाड्या आहेत. अक्षरश: रस्त्यावर लांबलांब पर्यंत गाड्या उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. याच गंभीर परिस्थितीवर शशांकने सोशल मीडियाद्वारे त्याची भूमिका व्यक्त केली आहे. या व्हिडीओखाली त्याला अनेकांनी या समस्येबाबत पाठींबाही दिला आहे. त्याने मांडलेली बाजू ही खरी असून अनेकांनी त्यांना या समस्येला रोज भोगावे लागत असल्याचे म्हटलं आहे. शशांकने याआधी अनेकदा राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर त्याने त्याच्या भूमिका व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकबद्दलची समस्या व्यक्त केली आहे.
दरम्यान, शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे तो जितका चर्चेत राहत असतो. तितकाच तो सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत चर्चेत राहत असतो.