बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आज आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त देश-विदेशातील चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सालाबादप्रमाणे आज मध्यरात्री त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी त्याने त्याची आयकॉनिक पोझ देत चाहत्यांचे आभार मानले. अशातच, अभिनेत्याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. शाहरुखचा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेला ‘जवान’ चित्रपट आज मध्यरात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. खुद्द शाहरुखने एक व्हिडीओ शेअर करत त्याची माहिती चाहत्यांना दिली. (Jawan movie OTT release)
शाहरुख खानसाठी यंदाचं वर्ष विशेष ठरलं. गेल्या सप्टेंबरमध्ये ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल १००० कोटींहून अधिकची कमाई केली होती. हा चित्रपट ‘पठान’ नंतर सलग दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. चित्रपटगृहातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मात्र, ज्यांना चित्रपट पाहता आला नाही, ते ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्याच्या वाढदिवशी ‘जवान’ चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, शाहरुखचा हा चित्रपट डिलिटेड सीन्ससहीत प्रदर्शित करण्यात आला.
हे देखील वाचा – Video : पापाराझी छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्याची लेन्स पडल्यावर श्रद्धा कपूरने काय केलं पाहा, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
नेटफ्लिक्सने ‘जवान’ ओटीटीवर प्रदर्शित करताच लगेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओला त्यांनी “जवानचा वाढदिवस आहे. पण सर्वांसाठी ही एक भेट आहे.”, असं कॅप्शन दिलं आहे. तर या व्हिडीओमध्ये शाहरुख खास ‘जवान’ स्टाईलमध्ये चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची घोषणा करतो. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी शाहरुखने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला असल्याची कमेंट केली. तर काही चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीचं गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बाळ आयसीयुमध्ये अन्…
दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली यांनी ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर त्याच्यासह अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपाती, प्रियमणी, सान्या मल्होत्रा, मराठमोळी गिरीजा ओकसह अनेक कलाकार झळकले आहेत. तर दीपिका पदुकोणने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. हा चित्रपट हिंदीसह तमिळ व तेलगू भाषेत प्रदर्शित झाला.