दाक्षिणात्य अभिनेत्री रेंजुषा मेननच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. रेंजुषाच्या निधनानंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री डॉ प्रिया हिचं निधन झालं आहे. ती ३५ वर्षांची होती. डॉ प्रियाच्या निधनानंतर याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली. ती आठ महिन्यांची गरोदर होती. अभिनेता किशोर सत्याने याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली. तसेच फेसबुक पोस्टद्वारे निधनाचं कारणही त्याने सांगितलं.
मंगळवारी (३१ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचं निधन झालं. किशोर सत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. डॉ प्रियाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिचं बाळ आता आयसीयुमध्ये आहे. तिला इतर कोणताच शारीरिक त्रास नव्हता. नियमित तपासणीसाठी ती रुग्णालयामध्ये जात होती. तरीही तिला हृदयविकाराचा झटका आला”.
आणखी वाचा – लग्न होऊनही एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे व विकी जैन, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “हनिमूननंतर…”
“एकुलत्या एक मुलीच्या निधनामुळे तिची आईही हादरुन गेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तिची काळजी घेणाऱ्या तिच्या नवऱ्याची अवस्था शब्दांमध्ये सांगू शकत नाही. रात्री रुग्णालयामध्ये गेल्यानंतर प्रियाच्या कुटुंबियांची कशाप्रकारे समजूत घालावी हेच मला कळत नव्हतं. इतक्या चांगल्या लोकांबरोबर देव असं का वागतो? रेंजुषाच्या निधनाचं दुःख पचवण्यापूर्वी आणखी एक निधन समोर आलं”.
“३५ वर्षांच्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं तेव्हा शोक व्यक्त करणंही योग्य वाटत नाही. प्रियाचे कुटुंबिय आणि तिचा पती यामधून कसं बाहेर येणार?. या दुःखावर मात करण्याची ताकद त्यांना मिळो”. ‘करुथमुथु’ मालिकेमध्ये प्रिया दिसली होती. लग्नानंतर तिने कलाक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. प्रियाच्या निधनानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.