मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेलं बेमुदत उपोषण अद्याप सुरूच आहे. सलग बेमुदत उपोषण केल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. सरकारने तातडीने यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. जोवर सरकार मागण्या मान्य करणार नाही, तोवर उपोषण सुरु राहणार अशी भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणावर आता राजकीय नेत्यांपाठोपाठ कलाकार मंडळींनीही मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. (Ketaki Chitale On Maratha Arakshan)
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने मनोज जरांगे पाटील यांच्या साखळी उपोषणात वाई तालुक्यात सहभागी होत या लढ्याला पाठिंबा दर्शविलेला पाहायला मिळाला. याशिवाय अभिनेता रितेश देशमुख याने देखील ट्विट करत आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा, असं म्हटलं. तर अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत लिहीत लढ्याला पाठिंबा देत म्हटलं आहे, “या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं “. याशिवाय अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने देखील ट्विट करत, ‘मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय, त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे’ अशी पोस्ट शेअर केली आहे. या कलाकारांपाठोपाठ आता मराठा आरक्षणावरून केलेली अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे सध्या अभिनयक्षेत्रात सक्रिय नसली, तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती अडचणीत सापडली असून एकदा तिला तुरुंगातदेखील जावं लागलं आहे. असं असूनदेखील ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बेधडक वक्तव्ये करत असते. आता तिने फेसबुकवर मराठा आंदोलनाला घेऊन एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं होतं, यांत केतकी चितळेने पोस्ट शेअर करत एक प्रश्न उपस्थित केला आहे.
केतकीने फेसबुकवरून एसटी बस फोडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह कॅप्शन देत तिने म्हटलं आहे की, “एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?? इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला UniformCivilLaw, तसेच UniformCriminalLaw ची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकुन तो दगड चालकाला लागला असता तर? ।।जय हिंद।। …।।वंदेमातरम्।। …भारत माता की जय’, असं म्हणत केतकीने तिची नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे.