‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन गाजला आणि लवकर संपलाही. पण या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण या सीझनचा विजेता ठरला. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला सर्वांच्या नकारात्मक कमेंट्सचा कारण ठरलेला सूरज नंतर मात्र सर्वांच्या आवडीचा झाला. या घरात त्याने आपल्या वागणुकीने सर्वांची मनं जिंकली. त्याचा साधाभोळा स्वभावच त्याला विजयापर्यंत घेऊन गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘बिग बॉस मराठी’नंतर त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. त्याला भेटण्यासाठी अनेक चाहते आजही आतुर असतात. (schoolgirl got emotional on meeting suraj chavan)
बिग बॉसचे पाचवे पर्व जिंकल्यानंतर सूरजला अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केलं जात आहे. त्याने आतापर्यंत अनेक शाळांनाही भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एका शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्याला पाहून शाळेतील विद्यार्थ्यांनी सूरज…सूरज असं म्हणत एकच कल्ला केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सूरज स्वत: शाळा शिकू शकला नाही. मात्र शाळेची ओढ त्याला आजही आहे. त्यामुळे लहान शाळकरी मुलांची बेट तो आवर्जून घेतो.
अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये एक शाळकरी मुलगी सूरजच्या भेटीसाठी आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच त्याला भेटल्यानंतर ती काहीशी भावुकही झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसंच या व्हिडीओत हुंदके देत रडत रडत असं म्हणते की, “मला तुला भेटायचं होतं. आज मी कुणाचा तरी स्टेटस बघितलं तर मला कळलं तू इथं आहेस. मग मी म्हटलं मला पण भेटायचं आहे. माझी मैत्रीण म्हणा की, तो आला आहे. तू इथेच होतास. मला कुणी आतमध्ये येऊ दिलं नाही. तरी मी तिथेच थांबले”.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे आणि अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसादही दिला आहे “भावा जिंकलस… लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत, सर्वांना हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व…”, “प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणलंस, सगळ्यांना हसवलंस; पण आयुष्यात तू काय कमवलं आहेस ना तर ही गोष्ट… अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांचं तू मन जिंकलं आहेस” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.