दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले. एक अनुभवी कलाकार म्हणून ते आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यामुळे त्यांचे अचानक निघून जाणे हे अनेकांच्या जिव्हारी चटका लावणारे होते. इरफान यांचा मुलगा बाबिल खाननेदेखील वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत अभिनयाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याने आत्तापर्यंत काही चित्रपटांमध्ये मुख्य आणि सहाय्यक भूमिका केल्या आहेत. बाबिलच्या कामाचे समीक्षकांनीही कौतुक केले आहे. (Babil Khan in Depression)
मात्र त्याच्या अभिनयाची तुलना त्याच्या वडिलांच्या अभिनयाशी होत असल्यामुळे तो सध्या नैराश्येमध्ये असल्याचे बोलले जात आहे. दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अनेकवेळा त्याची तुलना त्याच्या वडिलांशीही केली जाते. याबद्दल आता बाबिल खानची आई आणि इरफान यांची पत्नी सुतापा सिकदर यांनी याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. वडिलांबरोबरच्या तुलनेमुळे बाबिल खान नैराश्याचा बळी ठरल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत सुतापा म्हणाल्या की, “बाबिलवर खूप दबाव व तणाव आहे आणि मला ते आवडत नाही! हे दडपण असू नये. हे दडपण फक्त त्याच्या कामाबद्दल नाही तर वडील गमावण्याबद्दलदेखील आहे. बाबिल जवळजवळ नैराश्येमध्ये आहे. एक आई म्हणून त्याच्यावरचा तणाव मला नेहमीचे जाणवतो. तो खूप नाजूक आहे आणि त्याच्यात लढाऊ भावना नाही”. तसंच सुतापा यांच्या म्हणण्यानुसार, बाबिल तणाव आणि नैराश्यग्रस्त परिस्थितीतून जात आहे आणि त्यांना आशा आहे की तो त्यातून लवकर बरा होईल”.
दरम्यान, बाबिलबद्दल सांगायचे तर, त्याने ‘काला’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ज्यामध्ये त्याने तृप्ती डिमरी आणि स्वस्तिका मुखर्जीसोबत काम केले होते. यानंतर त्याने ‘फ्रायडे नाईट प्लॅन’ आणि ‘द रेल्वे मॅन’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. आता लवकरच तो त्याच्या आगामी ‘द उमेश क्रॉनिकल्स’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.